सध्याचा आघाडीचा पार्श्वगायक अरिजित सिंग याने चक्क ‘फेसबुक’वरून अभिनेता सलमान खानची माफी मागत आगामी ‘सुलतान’ चित्रपटातील आपले गाणे काढून टाकू नये, अशी मागणी सलमान खानकडे केली. एखाद्या गायकाने फेसबुकवरून सलमान खानची माफी मागणी मागण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असेल. त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत सलमान खानचा आजही दबादबा किती आहे, हे सुद्धा यावरून दिसते.
दोन वर्षांपूर्वी सलमान खान आणि अरिजित सिंग यांच्यामध्ये एका पुरस्कार सोहळ्यामध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाली होती. तेव्हापासून त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. सलमान खानच्या ‘किक’ चित्रपटासाठी अरिजित सिंगने गायलेले गाणे सलमानने चित्रपटातून काढायला लावले होते. त्यानंतर आता त्याच्या ‘सुलतान’साठीही अरिजित सिंगने एक गाणे गायले आहे. ते सलमानने चित्रपटातून काढू नये, अशी मागणी अरिजित सिंगने केली. त्याबद्दल त्याने ‘फेसबुक’च्या माध्यमातून सलमानची माफीही मागितली. अर्थात थोड्यावेळाने अरिजितने ही पोस्ट काढूनही टाकली.
सलमानची माफी मागण्याचा याआधीही आपण अनेकवेळा प्रयत्न केला. त्याचबरोबर प्रत्यक्ष भेटूनही माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणूनच आता आपण ‘फेसबुक’च्या माध्यमातून माफी मागत असल्याचे त्याने पोस्टमध्ये लिहिले होते. मी तुमचा अपमान केला, असे तुमचे म्हणणे गैरसमज असल्याचे त्याने लिहिले आहे. आतापर्यंत आपण अनेक गाणी गायली आहेत. पण सलमान खानसाठी गायलेले एक गाणे तरी माझ्या संग्रही असावे, असे मला मनापासून वाटते. कृपा करून माझ्या भावना समजून घ्या, असे अरिजितने लिहिले होते.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2016 रोजी प्रकाशित
… आणि अरिजितने ‘फेसबुक’वर मागितली सलमानची माफी
सलमान खान आणि अरिजित सिंग यांच्यात पुरस्कार सोहळ्यामध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाली होती
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-05-2016 at 12:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arijit singh posts public apology to salman khan