भारतीय सैन्याने शुक्रवारी रात्री सीमारेषेच्या परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या एका लहान मुलाला ताब्यात घेतले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरच्या परिसरात हा मुलगा लष्कराच्या जवानांना फिरताना आढळला. या मुलाची ओळख पटली असून त्याचे नाव अशफोर्ड अली चौहान असे आहे. अशफोर्ड हा पाकिस्तानच्या बलोच रेजिमेंटमधील निवृत्त कॉन्स्टेबल हुसैन मलिक यांचा मुलगा आहे. १२ वर्षांच्या अशफोर्डने दिलेल्या माहितीनुसार तो पाकच्या भिंबर जिल्ह्यातील दंगर पेर या गावात राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांत सीमेवर पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील गस्त वाढवण्यात आली आहे. काल जवानांच्या गस्तीपथकाला अशफोर्ड सीमारेषेच्या परिसरात फिरताना दिसला. भारतीय जवानांनी त्याला हटकल्यानंतर तो लगेच शरण आला. मात्र, दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्यासाठी त्याला या परिसराची रेकी करण्यासाठी पाठवल्याचा संशय भारतीय सैन्याला आहे. सैन्याकडून अशफोर्डची चौकशी करण्यात आल्यानंतर त्याला पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.

पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील पूँछ सेक्टरमधील कृष्णा घाटीत शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. पाकच्या या हल्ल्यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले होते. नायब सुभेदार परमजीत सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर हे या हल्ल्यात हुतात्मा झाले होते. हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानला योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ, अशा इशारा या घटनेनंतर भारतीय सैन्याकडून देण्यात आला होता. पुढील कारवाईची रणभूमी आणि वेळ आम्ही ठरवू, असेही भारतीय लष्कराने ठणकावून सांगितले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army apprehends 12 year old pok boy who was moving along border under suspicious circumstances
First published on: 06-05-2017 at 12:59 IST