चिनी सैन्याने लडाखमध्ये भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीबद्दल लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंग यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विक्रमसिंग यांना बोलावण्यात आले होते. चिनी सैन्याला भारतीय हद्दीतून माघार घ्यायला लावण्यासाठी लष्कराने आतापर्यंत कोणकोणत्या उपाययोजना केल्या, त्याची माहिती लष्करप्रमुखांनी मंत्रिमंडळाला दिली. या विषयावर तोडगा काढण्यासाठी कोणकोणत्या मार्गाचा अवलंब केला जाऊ शकतो, यावरही बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.चिनी सैन्याने लडाखमध्ये भारतीय हद्दीत सुमारे १९ किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली आहे. घुसखोरी लक्षात आल्यानंतर चीन आणि भारतीय सैन्यामधील ध्वजबैठकांमध्ये हा विषय उपस्थित करण्यात आला. आतापर्यंत अशा तीन बैठका झाल्या आहेत. मात्र, त्यामध्ये तरी कोणताही तोडगा निघालेला नाही. चुशूलमध्ये ब्रिगेडियर पातळीवरीलही एक बैठक मंगळवारी झाली. त्यातही तोडगा निघालेला नाही.