पीटीआय, नवी दिल्ली

“शत्रू पुढची चाल कुठली खेळेल, हे आम्हाला माहीत नसायचे, त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे बुद्धिबळासारखे होते. तसेच, हा ‘कसोटी सामना’ चौथ्या दिवशी थांबला असला, तरी तो दीर्घकालीन संघर्ष असू शकतो, आपली त्यासाठी तयारी हवी,’’ असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकतेच केले.

‘‘पुढील काळात हा देश एकट्यानेच नव्हे, तर कुठल्या तरी इतर देशाच्या पाठिंब्याने तो लढेल, त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे,’’ असे जनरल द्विवेदी कुठल्याही देशाचे नाव न घेता म्हणाले. पुढील युद्ध लवकरच होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

आयआयटी मद्रास येथे ४ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात जनरल द्विवेदी यांनी आपली मते मांडली. लष्कराने रविवारी त्यांचे भाषण प्रसिद्ध केले. ते म्हणाले, ‘‘हे ‘ऑपरेशन सिंदूर’, ही फक्त एक सुरुवात आहे. ही आता नवसामान्य स्थिती आहे. वेगाने बदलणाऱ्या जगात आपण राहत आहोत. अशा वेळी शांतता कायम राखण्यासाठी, प्रसंगी बळाचा, समन्वयाचा वापर करून एकत्रित प्रवास करण्याची गरज आहे. बुद्धिबळात शत्रू पुढची कुठली चाल खेळेल आणि नंतर आपण कुठली खेळू हे ठाऊक नसते. त्याला आम्ही ‘ग्रे झोन’ म्हणतो. त्यात आम्ही पारंपरिक युद्धाच्या दिशेने जात नाही.” ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते, असेही लष्करप्रमुखांनी सांगितले. निर्णयामध्ये कुठेही संदिग्धता नव्हती. कुठल्याही मर्यादा नव्हत्या. लष्कराचे मनोबल यामुळे उंचावले, असे ते म्हणाले.

कथनाचे व्यवस्थापन महत्त्वाचे’

अशा संघर्षाच्या परिस्थितीत ‘कथनाचे व्यवस्थापन’ (नरेटिव्ह मॅनेजमेंट) किती महत्त्वाचे असते, हेदेखील लष्करप्रमुखांनी अधोरेखित केले. कथन कशा पद्धतीने केले जाते, हे सांगताना ते म्हणाले, ‘तुम्ही हरलात की जिंकलात, असे पाकिस्तानी नागरिकाला विचारले, तर ते म्हणतील आमच्या लष्करप्रमुखांना संघर्षानंतर फील्ड मार्शल केले. त्यामुळे आम्ही जिंकलोच असू.’

पाकिस्तानच्या मर्मस्थळांवर प्रथमच हल्ले’

‘पहलगाम हल्ल्यानंतर २५ एप्रिल रोजी उत्तर कमांडला आम्ही भेट दिली. त्या ठिकाणी प्रत्युत्तर कशा पद्धतीने द्यायचे त्याचे नियोजन केले आणि त्याची अंमलबजावणी केली. अचूक हल्ल्यांचे घाव पाकिस्तानच्या मर्मस्थळांवर केले. त्याची त्यांनाही कल्पना नव्हती. हे प्रथमच घडले आहे. याचा पाकिस्तानला धक्का बसला. या हल्ल्यांना मिळणाऱ्या प्रत्युत्तरासाठी आपण तयार होतो का, तर होतो. आपण तयार होतो. कुठलाही प्रतिहल्ल्याला सामोरे जाण्याच्या तयारीत होतो,’ असे लष्करप्रमुख म्हणाले.

युद्धसज्जता अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञान जवानापर्यंत जाऊन पोहोचले पाहिजे. त्यामुळेच मी ‘ईगल ऑन द आर्म’ (ड्रोन) हा शब्दप्रयोग वापरतो. आपल्या १२ लाखांच्या लष्करामध्ये प्रत्येकाकडे ड्रोन असायला हवे.- जनरल उपेंद्र द्विवेदी, लष्करप्रमुख