जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील मछना गावाजवळ भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर कोसळले आहे. यावेळी हेलिकॉप्टरमधून भारतीय लष्काराचे तीन जवान प्रवास करत होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या अपघातात तीनही जवान जखमी झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा – Video: “आता झेलेन्स्कींना ठार करण्याशिवाय पर्याय नाही”, रशियानं दिली जाहीर धमकी; ड्रोन हल्ल्यानंतर तणाव वाढला!

एएनआयने भारतीय लष्कराच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आज सकाळी ११ च्या सुमारास जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील मारवाह तालुक्यात असलेल्या मछना गावाजवळ भारतीय लष्कराच्या ‘एएलएच ध्रुव’ या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये पायलट, सह पायलट आणि एक जवान, असे तिघे जण होते. यावेळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटने हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पायलटला यात यश आले नाही आणि हेलिकॉप्टर थेड माऊरा नदीच्या किनारी जाऊन कोसळले.

हेही वाचा – हायकोर्टाच्या निर्णयानंतर मणिपूरमध्ये तणाव; हिंसाचार रोखण्याकरता लष्करी जवान तैनात, ईशान्य राज्यात नेमकं घडतंय काय?

या घटनेची माहिती मिळताच लष्कराची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तिन्ही जखमी जवानांना उधमपूरमधील लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघाताचं नेमकं कारण अद्याप माहिती नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – रेल्वेत खाली आदळलं अन् १५ मिनिटं गळा दाबून धरला, तरुणाच्या खूनाचा VIDEO व्हायरल

विशेष म्हणजे गेल्या मार्च माहिन्यात अरुणाचल प्रदेशमध्येही अशाच प्रकारे लष्कराच्या चीता या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. या घटनेत लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते.