संतापजनक! झारखंडमध्ये मास्क न घातल्याने जवानाला बेदम मारहाण  

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या कृत्याविरोधात लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

javan beaten up by police

झारखंडच्या चतरा जिल्ह्यात मास्क न घातल्याबद्दल भारतीय सैन्यातील एका जवानाला बुधवारी पोलीस कर्मचाऱ्यांनी अमानुषपणे मारहाण केली. मयूरखंड पोलीस स्टेशन परिसरातील कर्मा बाजारात ही घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडीओ फुटेजमध्ये पवन कुमार यादव या जवानाला पोलिसांच्या टीमने मारहाण केल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या कृत्याविरोधात लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्यांसह दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

चत्रा येथे लोक करोनाच्या नियमांचं पालन आणि मास्कबद्दल पोलिसांकडून तपासणी सुरू होती. याचवेळी जवळच्या आरा-भुसाही गावातील रहिवासी आणि सैन्यातील जवान पवनकुमार यादव आपल्या दुचाकीवर तिथे पोहोचला. गश्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले आणि हवालदार संजय बहादूर राणाने त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतल्या. जवानाने विरोध केला असता पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला लाथा -बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मास्क न घातल्यामुळे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःदेखील मास्क घातलेले नव्हते.

दरम्यान, स्थानिकांनी मध्यस्थी करत जवानाला वाचवलं. त्यानंतर जखमी जवानाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कारण नसताना पोलिसांनी जवानाला बेदम मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच बीडीओ साकेत सिंह स्वतः हजर असताना जवानाला मारहाण करण्यात आली असून हा प्रकार गंभीर आहे. परिसरात घटनेचा विरोध करण्यात आल्याने पोलीस निरीक्षक राकेश रंजन यांनी दखल घेत प्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच स्थानिक खासदार सुनील कुमार सिंह यांनीही रंजन यांच्याशी बोलून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यांसह दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Army jawan beaten up by police for not wearing mask in jharkhand hrc

ताज्या बातम्या