नक्षलवाद्यांविरोधातील कारवाईत लष्कराच्या सहभागाची शक्यता फेटाळून लावतानाच माओवाद्यांचे प्राबल्य असलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी निमलष्करी दलाच्या तुकडय़ांचे साहाय्य घेण्यात येईल, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले.गेल्या शनिवारी काँग्रेसच्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुरक्षा व्यवस्थेत कोणत्या त्रुटी होत्या, या प्रकरणास नेमके कोण जबाबदार होते, हे निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती केंद्रीय गृह सचिव आर. के. सिंग यांनी दिली. नक्षलवादविरोधी कारवाईत आम्ही लष्करास सामील करून घेणार नाही आणि तशी गरजही नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या ‘परिवर्तन यात्रे’वर झालेल्या हल्ल्याप्रकरणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सिंग हे सध्या या भागाच्या दौऱ्यावर आहेत. नक्षलवाद्यांचे प्राबल्य असलेल्या भागांमध्ये सरकारने गेल्या तीन वर्षांत विकासाचे अनेक कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविले असून त्यामुळे माओवादी नक्षलवादी पिछाडीस गेले आहेत. शनिवारच्या घटनेमुळे विकासकामांना जराही खीळ बसणार नाही. उलट ही प्रक्रिया अधिकच मजबूत करण्यात येईल, असा दावा सिंग यांनी केला.
माओवाद्यांच्या आंतरराज्यीय हालचाली सुरू असतात. छत्तीसगढ, झारखंड, ओदिशा अशा विशिष्ट राज्यांच्या सरहद्दींवरील संपर्क यंत्रणा खूपच अकार्यक्षम आहे आणि त्यामुळे ते एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सहज घुसखोरी करतात, अशी माहिती त्यांनी दिली.
अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि अधिक सुरक्षा दलांच्या साहाय्याने नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल, असे आर.के. सिंग यांनी सांगितले. छत्तीसगढच्या नजिक असलेल्या नक्षलग्रस्त राज्यांसमवेत आम्ही विचारविनिमय करू आणि नक्षलवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी राज्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरविण्यात येतील, असे ते म्हणाले. बस्तर विभागातील नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत त्यांनी दिले.
विद्याचरण शुक्ला यांची प्रकृती स्थिर परंतु चिंताजनक
गुरगाव : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विद्याचरण शुक्ला यांच्यावर माओवाद्यांनी शनिवारी केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती आता अल्प प्रमाणात सुधारत असली तरी चिंताजनक आहे. ८४ वर्षीय शुक्ला यांची प्रकृती आता किंचित प्रमाणात सुधारत असली तरी ते धोक्याबाहेर आहेत असे म्हणणे अत्यंत घाईचे ठरेल, असे मेदान्त रुग्णालयाचे चेअरमन डॉ. नरेश त्रेहान यांनी सांगितले. शुक्ला यांच्या प्रकृतीत पुढील २४ तासांत सुधारणा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
शहीद शिपायाच्या पत्नीला नोकरी
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेले शिपाई राहुल प्रतापसिंग यांच्या पत्नीला नोकरी व १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी जाहीर केला.

भाजपचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल
नवी दिल्ली : छत्तिसगढमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या देशातील अनुपस्थितीवरून लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने जोरदार हल्लाबोल केला आह़े  नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामुळे देशात खळबळ उडालेली असताना शिंदे मात्र गेल्या चार दिवसांपासून खासगी सहलीवर आहेत़  सुशीलकुमार शासकीस दौऱ्यावर होत़े  ते परदेशातून घटनेवर नजर ठेवून आहेत, असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे, परंतु ते समाधानकारक नसल्याची टीका भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी केली़   घटनास्थळावरील परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत असत़े  त्यामुळे बदलती परिस्थिती हाताळण्यासाठी कॉंग्रेसने अधिकाधिक सतर्क असायला हवे, असा सल्लाही त्यांनी दिला़

नक्षलवादी हल्ल्याचे काँग्रेसकडून क्षुद्र राजकारण
छत्तीसगढमधील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात काँग्रेसचे नेते ठार झाल्याप्रकरणी या नेत्यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली नव्हती, असा आरोप करून काँग्रेस या मुद्दय़ाचे क्षुद्र राजकारण करीत आहे, असा आरोप भाजपने मंगळवारी केला. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याप्रकरणी भाजपने जाणीवपूर्वक संयम बाळगून एक जबाबदारीचे भान म्हणून आम्ही आरोप-प्रत्यारोपांच्या भानगडीत पडलो नाही, परंतु काँग्रेस मात्र राज्य सरकारवर आरोप करून क्षुद्र राजकारण करीत आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केला. चिखलफेक करण्यापेक्षा केंद्र व नक्षलग्रस्त राज्ये या संकटाचा मुकाबला कशा प्रकारे करतील, यासाठी काँग्रेसने परिणामकारक समन्वयाचे धोरण राबवावे, असे आवाहन जावडेकर यांनी केले.