आक्रमक आणि धारदार सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी शनिवारी माध्यमविश्वात पुनरागमन केले. अर्णब यांची बहुचर्चित ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी आजपासून सुरू झाली. गेल्या वर्षभरापासून माध्यमविश्वात अर्णब यांच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ची प्रचंड चर्चा सुरू होती. अर्णब गोस्वामी यांनी गेल्यावर्षी ‘टाईम्स नाऊ’च्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी सुरू करण्याबद्दल सुतोवाच केले होते. अखेर आजपासून ही वृत्तवाहिनी सुरू झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज ही वृत्तवाहिनी सुरू होताना अर्णब गोस्वामी यांनी एका स्वगताद्वारे आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी प्रेक्षकांनी दाखवलेल्या संयमाचे कौतूक केले. तसेच आपल्याला नवीन वृत्तवाहिनी सुरू करण्यासाठी इतका वेळ का लागला, याबद्दलचे स्पष्टीकरण दिले. मला जेव्हा विनाकारण कायेदशीर नोटीसा पाठवण्यात आल्या तेव्हा तुम्ही माझ्या पाठिशी उभे राहिलात. हा पाठिंबा मिळाल्याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजतो. हे सर्व विधिलिखितच होते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाचा रोख अप्रत्यक्षपणे ‘टाईम्स समूहा’कडून पाठविण्यात आलेल्या कायदेशीर नोटीसकडे होता. टाईम्स समूहाने अर्णब गोस्वामी यांना ‘नेशन वॉन्ट्स टू नो’, ही टॅगलाईन वापरु नये, यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली होती. अर्णब यांनी त्यांच्या नव्या वृत्तवाहिनीवर नेशन वॉन्ट्स टू नो, ही टॅगलाईन वापरु नये, असे टाईम्स समूहाने नोटीसमध्ये म्हटले होते.

अर्णब गोस्वामी यांनी गेल्यावर्षी ‘टाईम्स नाऊ’च्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिला होता. ‘टाईम्स नाऊ’वरील त्यांचा रात्री ९ वाजता प्रसारित होणारा ‘द न्यूजअवर’ हा कार्यक्रम विशेष लोकप्रिय होता. या एका कार्यक्रमातून टाईम्स नाऊला ६०% उत्पन्न मिळत होते. याशिवाय ‘फ्रँकली स्पिकींग’ कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्णब गोस्वामी राजकारणी, सेलिब्रिटी, खेळाडूंसह महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घ्यायचे. अर्णब गोस्वामी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘टाईम्स नाऊ’ वृत्तवाहिनीने टिआरपी रेटिंगमध्येही दमदार कामगिरी केली. त्यामुळेच ‘टाईम्स समूहा’ने अर्णब गोस्वामींची ‘टाईम्स नाऊ’ आणि ‘ईटी नाऊ’ या वाहिन्यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arnab goswami republic tv goes live
First published on: 06-05-2017 at 12:07 IST