येत्या रविवारपासून उत्तर प्रदेशमध्ये सुरू होणाऱ्या यात्रेबाबत विश्व हिंदू परिषदेने आग्रही भूमिका घेतलेली असतानाच जिल्हा प्रशासनाने मात्र त्याविरोधात कंबर कसली आहे. विहिंपच्या ७० नेत्यांविरोधात फैझाबाद जिल्हा प्रशासनाने अटकेचे आदेश जारी केले आहेत.
फैझाबादचे जिल्हा दंडाधिकारी विपीन कुमार द्विवेदी यांनी अशोक सिंघल, प्रवीण तोगडीया, राम विलास वेदांती यांसह ७० जणांविरोधात वॉरंट बजावली आहेत. जातीय दंगलींची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली आहे.
 विश्व हिंदू परीषदेच्या २० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र वेदांतींसह अनेक नेते भूमिगत झाले आहेत, अशी माहिती पोलीसांनी दिली. त्यामुळेच शेजारील राज्यांनीदेखील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांविरोधात शक्य तितकी माहिती कळवावी, असे आवाहन उत्तरप्रदेश सरकारने केले आहे. या ‘८४ कोस परीक्रमे’त ४० ते ५० हजार कार्यकर्ते सहभागी होतील असा अंदाज आहे.
येत्या २५ तारखेपासून सदर यात्रा सुरू होणार असून फैझबाद, बस्ती, बाराबंकी, गोंडा, बऱ्हैच व आंबेडकर नगर या जिल्ह्य़ांमधून तीचा नियोजित प्रवास होणार आहे.  
खबरदारीचा उपाय म्हणून शीघ्र कृती दलाच्या तीन कंपन्या, दोन पोलीस अधीक्षक, १९ अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ४५ पोलीस उपाधीक्षक, १३५ निरीक्षक, ४३० उपनिरीक्षक आणि १३०० हवालदार तैनात करण्यात आले आहेत.