घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आल्याच्या निर्णयाला दोन वर्षे झाल्याच्या दिवशी, गुरुवारी गुपकार आघाडीने (पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन- पीएजीडी) जम्मू- काश्मीरमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली, तसेच आपल्या लोकांचे ‘रास्त हक्क’ पुनस्र्थापित करण्यासाठी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

या आघाडीचे अध्यक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांच्या गुपकार भागातील निवासस्थानी आघाडीच्या घटक पक्षांची बैठक पार पडली. संघटनेच्या उपाध्यक्ष व पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती, प्रवक्ते व माकपचे नेते एम.वाय. तारिगामी, तसेच अवामी नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुझफ्फर शाह हे या बैठकीला उपस्थित होते.

जम्मू- काश्मीरमधील परिस्थितीबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. आपल्या वैध हक्कांच्या पुनस्र्थापनेसाठी आपला लढा सुरू ठेवण्याच्या निर्धाराचा आघाडीने पुनरुच्चार केला, असे तारिगामी यांनी या बैठकीनंतर अब्दुला यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांना सांगितले.

‘सरकारने मोठमोठे दावे केले असले, तरी ५ ऑगस्ट २०१९ पासून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती दररोज बिघडत आहे. परिस्थिती सामान्य होईल व हिंसाचार संपुष्टात येईल असा दावा त्यांनी केला होता, मात्र अलीकडेच राज्याचा दर्जा बहाल करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी सभागृहात कसा प्रतिसाद दिला हे तुम्ही पाहिले. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर योग्य वेळी हा दर्जा बहाल करण्यात येईल असे मंत्र्यांनी सांगितले’, असे माकपचे नेते तारिगामी म्हणाले.

जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यामुळे गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा दावा केंद्र सरकारने केला होता, त्या कुठे आहेत, असा प्रश्नही तारिगामी यांनी विचारला.

एकंदर परिस्थिती शांत

जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या निर्णयाच्या दुसऱ्या वर्धापन दिनी श्रीनगरच्या काही भागांतील बहुतांश दुकाने बंद होती, मात्र एकंदर परिस्थिती शांत होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लाल चौक सिटी सेंटरसह शहराच्या अनेक भागांतील दुकाने बंद होती; तर दक्षिण काश्मीरातील अनंतनाग जिल्हा आणि बडगाम, गंदेरबाल व कुपवाडा यांच्या काही भागांतील दुकाने सुरू होती. तथापि, दुकाने उघडी ठेवण्यासाठी पोलीस आपल्यावर बळजबरी करीत असल्याचा आरोप लाल चौकासह अनेक भागांतील दुकानदारांनी केला. पोलिसांनी आपल्या दुकानांची कुलुपे तोडल्याचा दावाही त्यांच्यापैकी अनेकांनी केला. श्रीनगरच्या अनेक भागांत सार्वजनिक वाहतूक बंद होती, असे अधिकारी म्हणाले. कुठल्याही फुटीरवादी गटाने बंदचे आवाहन केलेले नसले, तरी अनेक भागांत स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला. सध्या नजरकैदेत असलेले कट्टरवादी हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सैयद अली शाह गिलानी यांच्या नावे जारी करण्यात आलेले ‘बंद’चे आवाहन करणारे पत्र ‘बनावट’ असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे पत्र समाजमाध्यमांवरून प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आतापर्यंत शांत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.