नागपूर खंडपीठापुढे सोमवारी हजर व्हावे लागणार
ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांना स्थानबद्ध करून त्यांचा तुरुंगात छळ करण्यात आल्याचे मत एका लेखात मांडले होते त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयीन बेअदबीची जी नोटीस पाठवली होती त्यावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
अरुंधती रॉय यांना नागपूर येथील खंडपीठापुढे २५ जानेवारीला उपस्थित राहण्याच्या आदेशातून सूट देण्यासही नकार देण्यात आला. सोमवारी त्यांनी न्यायालयात हजर रहावे, असे सांगून न्यायालयाने रॉय यांच्या उच्च न्यायालयाच्या आव्हान याचिकेवर संबंधितांना नोटिसा जारी केल्या
आहेत.
लेखिका रॉय यांची बाजू मांडताना वकील चंदर उदय सिंग यांनी सांगितले की, रॉय यांना व्यक्तीगत उपस्थितीतून सूट देण्यात यावी. रॉय यांच्या प्रतिमा जाळण्यात येत असून आम्हाला सुरक्षेची भीती वाटते असे कारण त्यांनी दिले.
न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळताना सांगितले की, तुम्ही न्यायालयात उपस्थित रहाल, आम्ही काळजीपूर्वकच हा आदेश देत आहोत, असे. न्या. जे.एस. खेहार व न्या. सी.नागप्पन यांनी सांगितले. सोमवारी व्यक्तीगत उपस्थितीतून सूट द्यावी अशी मागणी वकिलांनी पुन्हा केली असता न्यायालयाने सांगितले की, आम्ही तुम्हाला तशी परवानगी देऊ शकत नाही.