लोकसभा निवडणुकीनंतर नऊ महिन्यात चार वेळा जल्लोष व काहीसा उन्माद अनुभवणाऱ्या भाजपच्या ११, अशोका रस्त्यावर मंगळवारी सन्नाटा होता. काँग्रेसच्या २४, अकबर रस्त्यावरील मुख्यालयास तर नऊ महिन्यांपासून स्मशानशांततेची सवयच झाली होती.  गजबजलेले होते ते दिल्लीचे रस्ते. एरव्ही पराभवानंतर कुणाही राजकीय पक्षाचे कार्यालय ओस पडलेले असते. ९ फेब्रुवारीपर्यंत तशीच शांतता ‘आप’च्या समर्थकांमध्येही होती.
निकाल घोषित होत असताना ‘झाडू’न सारी स्वच्छता झाल्यावर दिल्लीच्या रस्त्यारस्त्यावर ‘आम आदमी’ अवतरला होता. पश्चिम दिल्लीकडून मध्य दिल्लीत प्रवेश करता येणारा पूसा रोड, शंकर रोड, गोल डाकखान्याचा परिसर झाडूमय झाला होता. कुणाच्याही प्रचाराने न भारावलेला मूक मतदार ‘आप’ले यश साजरे आपापल्या तंद्रीत साजरे करीत होता. १७३ नॉर्थ अ‍ॅव्हेन्यूमध्ये जल्लोष सुरूच होता. ‘पाँच साल – केजरीवाल’ची घोषणा कार्यकर्ते देत होते. सायकल रिक्षा, ऑटोचालक तर जणू काही ५६ इंचांची छाती पुढे काढून आपापल्या कारभारात मग्न होते. महाविद्यालयीन पोरापोरींनी डोक्यावर ‘आप’ची टोपी व गालावर तिरंगा रंगवून उत्स्फूर्तपणे मोटरसायकल रॅली काढली होती. निती आयोगाच्या मागचा परिसर म्हणजे रफी मार्ग. या मार्गावर आयएनएसची इमारत आहे. समोरच असलेल्या कॉन्स्टिटय़ूशन क्लबमध्ये केजरीवाल यांनी जिंकलेल्या उमेदवारांची बैठक बोलावली होती.  
रस्त्यावर तोबा गर्दी. गर्दीतून वाट काढून एखाददुसरे वाहन क्लबमध्ये शिरल्यास त्याभोवती गर्दी जमत असे. गाडीत बसलेला कोण कुणालाही ठावूक नाही. सात-आठ जण गाडीतून उतरल्यावर कुणीतरी ‘मी एमएलए’ अशी ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करी. त्यास बैठकीच्या ठिकाणी सोडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनिया-राहुल यांच्याकडून अभिनंदन
काँग्रेस पक्ष गमाविलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवेल. पक्षाच्या विचारसरणीनुसार काम करून जनतेचा पाठिंबाही मिळवेल, असे काँग्रेसने एका निवेदनात म्हटले आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचे अभिनंदन केले आहे. जनतेने दिलेल्या निकालाचा आम्ही आदर करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे.

पुण्यातून दिल्ली निवडणुकीला मदत!
‘दिल्लीबाहेरून खास निवडणूक प्रचार आणि नियोजनासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ५० टक्के कार्यकर्ते महाराष्ट्रातले होते. यात महाराष्ट्रातले १०००, तर पुण्यातले ३०० कार्यकर्ते होते. याबरोबरच मतदानाच्या दिवशी दिल्लीतील पक्षाच्या बूथवर झालेली गर्दी हाताळण्यासाठी पुण्यातील काही कार्यकर्त्यांनी पुण्यातच राहून सुद्धा काम केले,’ असे सुभाष वारे यांनी सांगितले. वारे म्हणाले, ‘‘ज्या कार्यकर्त्यांना दिल्लीत जाणे शक्य झाले नाही त्यांनी पुण्यातून मदत केली.  दिल्लीच्या १२ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी इथल्या कार्यकर्त्यांकडे सोपवली गेली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal celebrates the delhi assembly elections 2015 victory
First published on: 11-02-2015 at 05:08 IST