कथित उत्पादन शुक्ल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. सीबीआयने केजरीवाल यांना रविवारी (१६ एप्रिल) चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या समन्सवरून अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली.

हेही वाचा – “पोलीस बंड करतील या भीतीपोटीच नरेंद्र मोदी सरकारने काश्मीर केंद्रशासित केलं”, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा मोठा दावा!

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

“गेल्या वर्षभरापासून भाजपाकडून उत्पादन शुक्ल घोटाळ्याप्रकरणी आमच्यावर आरोप केले जात आहेत. त्यानंतर तपास यंत्रणाही सर्व कामं सोडून आमच्या मागे लागल्या आहेत. सीबीआय आणि ईडीकडून रोज कोणालातरी पडकडून त्रास दिला जातो आहे. त्यांच्यावर आमच्याविरोधात बोलण्यासाठी दबाव आणला जातो आहे”. असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी यावेळी बोलताना केला.

“या देशात नेमकं काय चाललंय?”

“मला काल सीबीआयने समन्स बजावले. त्यांनी आमच्यावर १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. गेल्या वर्षभरापासून याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. यादरम्यान त्यांनी आतापर्यंत अनेकदा आमच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. मात्र, त्यांना एक रुपयासुद्धा मिळालेला नाही. मला पंतप्रधान मोदींना विचारायचं आहे की या देशात नेमकं काय चाललंय? त्यांना वाटत असेल की मी चोर आहे, तर मग या पृथ्वीतलावर कोणीही इमानदार नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – केजरीवाल यांच्या सीबीआय चौकशीवरून काँग्रेसकडून ‘आप’वर शरसंधान; आरजेडी, ठाकरे गट केजरीवाल यांच्या पाठीशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह

दरम्यान, त्यांनी यावेळी तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सीबीआय आणि ईडीने न्यायालयातही खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत. एकीकडे मनीष सिसोदिया यांनी त्यांचे १४ फोन नष्ट केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे त्यापैकी चार फोन सध्या सिसोदियांकडे आहेत, असंही ईडीचं म्हणणं आहे. मग सिसोदियांनी जर १४ फोन नष्ट केले, तर त्यांच्याकडे चार फोन कसे काय? याचाच अर्थ तपास यंत्रणांनी खोटं बोलून आमच्यावर गुन्हे दाखल केला आहे”, असा आरोप त्यांनी केला.