नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी आल्याने दिल्ली सरकारने केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली, माजी मंत्री मुरली देवरा यांच्यासह रिलायन्स उद्योगाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि इतरांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
माजी कॅबिनेट सचिव टी.आर.एस. सुब्रमण्यम, अ‍ॅडमिरल ताहिलियानी, विख्यात वकील कामिनी जैस्वाल यांनी याबाबत तक्रार केल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
नैसर्गिक वायूची किंमत वाढवण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतल्याने रिलायन्सला त्याचा लाभ झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. कृष्णा-गोदावरी खोऱ्यात रिलायन्सने अपेक्षित उत्पादन न घेता सरकारवर किमती वाढवण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला. नैसर्गिक वायूचा सध्याचा प्रतियुनिट ४.२ डॉलर असलेला दर १ एप्रिलपासून ८ डॉलर करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला आहे. काही मंत्री आणि रिलायन्स यांच्या स्नेहपूर्ण संबंधांमुळेच हे दर दुप्पट करण्याचा निर्णय झाल्याचा आरोप त्यांनी केला. किंमत वाढल्याने रिलायन्सला दरवर्षी ५४ हजार कोटींची फायदा होईल असे तक्रारीत म्हटले आहे. चौकशी करूनच किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा, असे पत्र पंतप्रधानांना लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
रिलायन्सने अपेक्षेपेक्षा १८ टक्के कमी उत्पादन घेऊन कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. उत्पादन खर्चाच्या नव्हे तर आंतरराष्ट्रीय दरांच्या पातळीनुसार भाववाढ करण्याचा निर्णय अमान्य असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. दिल्ली सरकारला याच्या चौकशीचा अधिकार आहे काय, असे विचारता केजरीवाल यांनी उत्तर टाळले. रिलायन्सकडून मात्र याबाबत कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.