पंजाब विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. जसजशा निवडणुका जवळ येत आहेत. तसतसे सुखबीर बादल यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळे ते आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार व कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत. ते दररोज खोटया सीडीज बनवून ‘आप’ची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत ‘आप’ची पंजाबवर सत्ता आल्यानंतर सर्वात प्रथम बादल यांना तुरूंगात पाठवणार असल्याचा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पंजाबच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पंजाबमध्ये निवडणूक लढवण्याचा ‘आप’ने निर्णय घेतल्यानंतर येथील लोकांनी आम्हाला बादल यांच्या राजकीय कटाची माहिती दिली होती. ‘आप’ला अडचणीत आणण्यासाठी बादल यांनी एका कंपनीला कंत्राटच दिले आहे. या कंपनीकडून रोज आप विरोधात एखादी बनावट सीडी तयार केली जाते आणि त्या प्रसारमाध्यमात प्रसिद्ध केल्या जातात. अशा त्यांच्याकडे ६३ बनावट सीडी तयार ठेवल्याचा आरोप करत जनतेला सर्व सत्य माहित आहे, असे त्यांनी म्हटले.
आप अशा गोष्टींना घाबरणारा पक्ष नाही. आम्ही जनतेसाठी लाठ्या खाल्ल्या, तुरूंगात गेलो. संपूर्ण पंजाब आमच्या मागे आहे. वातावरण आम्हाला अनूकुल आहे. यावेळची निवडणूक ही निवडणूक नाही तर एक क्रांती असेल, विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.
येत्या ११ तारखेला आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून यादिवशी खास शेतकऱ्यांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहोत. एकेकाळी पंजाबमधील शेतकरी सुखी व संपन्न होता. आज पंजाबमधील शेतकरीही आत्महत्या करत आहेत. आम्हाला पंजाबच्या शेतकऱ्याला पुन्हा समृद्ध बनवायचे आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांसाठी आम्ही अनेक योजना आणत असून आम्हाला येथील शेतकरी कर्जमुक्त बनवायचा आहे.
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार
राज्यातील गरीब शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणा असून इतर शेतकऱ्यांचे व्याज माफ करणार. तसेच डिसेंबर २०१८ पर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती याशिवाय इतर अनेक सुविधा देणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal slams on sukhbhir singh badal
First published on: 08-09-2016 at 14:19 IST