लखनऊ : लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशीष मिश्रा याचा जामीन अर्ज न्यायालयाने बुधवारी फेटाळला. दरम्यान, या प्रकरणातील आणखी दोन आरोपींना विशेष तपास पथकाने अटक केली.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशीष आणि अन्य एक आरोपी आशीष पांडे यांनी बुधवारी न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

विशेष तपास पथकाने १२ तासांच्या चौकशीनंतर ९ ऑक्टोबरला आशीष मिश्राला अटक केली होती. मंगळवारपासून तो तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अंकित दास आणि लतीफ या दोघांना अटक केली असून, आतापर्यंत अटकेतील आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन

नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचारप्रकरणी काँग्रेसच्या  शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या तात्काळ राजीनाम्याची तसेच, निष्पक्ष तपासासाठी सर्वोच्च न्यायालयातील दोन विद्यमान न्यायाधीशांची चौकशी समिती नेमण्याची मागणी काँग्रेसने केली.