पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या जप्तीच्या कारवाईला नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड इंटरनॅशनलने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने नीरव मोदींच्या वकिलांना खडे बोल सुनावले आहेत. आधी नीरव मोदीला भारतात परतायला सांगा, असे हायकोर्टाने मोदीच्या वकिलांना सांगितले.

पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटी रुपयांनी फसवणाऱ्या आणि त्यानंतर भारतातून फरार झालेल्या नीरव मोदीने सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले आहे. सीबीआयच्या तक्रारीनंतर ईडीने नीरव मोदीच्या देशभरातील मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली. या कारवाई विरोधात नीरव मोदीच्या कंपनीच्या वतीने गेल्या महिन्यात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर बुधवारी हायकोर्टात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने नीरव मोदींच्या वकिलांना झापले. नीरव मोदीला आधी भारतात परतायला सांगा, असे हायकोर्टाने सांगितले. यावर नीरव मोदी कुठे आहे ते माहित नाही. मी त्याच्या कंपनीची बाजू मांडतोय, असे त्याच्या वकिलांनी सांगितले.

दरम्यान, नीरव मोदीला दोन दिवसांपूर्वी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दणका दिला होता. नीरव मोदी याच्या लंडनमधील बँक खात्यावर जप्ती आणण्यास विशेष न्यायालयाने सोमवारी सीबीआयला परवानगी दिली. मोदी याच्या या बँक खात्यात १२ लाख ७० हजार ब्रिटिश पॉण्ड्स तसेच एक हजार २४४ अमेरिकी डॉलर एवढी रक्कम शिल्लक आहे.