एक काळ असाही होता की भारतात बहुपत्नीत्वाची प्रथा होती. मात्र आता बहुपत्नीत्वावर बंदी घालणारा कायदा एका राज्यात आणण्याची तयारी सुरु झाली आहे. याबाबतच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. आसाममध्ये हा कायदा आणायची तयारी सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काय म्हटलं आहे?
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी पत्रकार परिषद घेतली. आसाम सरकारने Prohibition Polygamy Bill 2025 असं नाव या विधेयकाला दिलं आहे. या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. अशा प्रकारे विधेयक आणणारं आसाम हे पहिलंच राज्य आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले या विधेयकात सहाव्या अनुसूचीतील क्षेत्रांसाठी काही सूट दिली जाऊ शकते. तसेच आधी ज्या महिलांच्या पतीने दुसरे लग्न केले आहे अशा महिलांसाठी सरकार एक नवीन निधीची घोषणा करणात आहे. याद्वारे त्या महिलांना आपल्या जीवनात पुढे जाण्यास मदत होणार आहे.
दुसरं लग्न केल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवास
“आसाम मंत्रिमंडळाने बहुपत्नीत्वावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकाचे नाव आसाम बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक, २०२५ असे आहे. हे विधेयक २५ नोव्हेंबर रोजी विधानसभेत सादर केले जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने दुसरे लग्न केले तर त्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. तसेच पीडित महिलांच्या कल्याणासाठी आम्ही आर्थिक मदत करणार आहोत.
आसाम सरकारचा आणखी एक महत्त्वाचा निर्णय
पत्रकार परिषदेत सरमा यांनी आणखी एक घोषणा केली आहे. राज्य सरकार संवेदनशील आणि दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींना फेब्रुवारी २०२६ मध्ये बंदूक परवान्यांची पहिली तुकडी जारी करेल. सरकारला आदिवासींकडून बंदूक परवान्यांसाठी मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत, ज्यांची सध्या तपासणी सुरू आहे. निवडक पद्धतीने आम्ही परवाने जारी करणार आहोत. दरम्यान, हे परवाने जारी केल्यानंतर आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागांसाठी मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
