युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही आणि युवक काँग्रेसचे सचिव वर्धन यादव यांच्यावर काँग्रेस आसामच्या युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. अंगकिता दत्ता यांनी छळाचे गंभीर आरोप केले होते. तसेच, याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही अद्याप साधी चौकशी समितीही नेमण्यात आली नाही, असं अंगकिता दत्तांनी म्हटलं होतं. अशातच अंकिता दत्तांवर काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. त्यांची पक्षातून ६ वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

अंगकिता दत्तांनी श्रीनिवास बी.व्ही यांच्याविरोधात छळाचे आरोप केले आहेत. याबद्दल अंगकिता दत्तांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींना माहिती दिली होती. पण, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी आसामच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहित या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती. तसेच, सविस्तर अहवाल सादर करण्याचं निर्देश दिले होते.

हेही वाचा : अमेरिकेमुळे रशियाने रोखली भारताच्या शस्त्रांची आयात; नेमकं काय आहे कारण?

अशातच काँग्रेसकडून अंगकिता दत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. अंगकिता दत्तांची ६ वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका अंगकिता दत्तांवर ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : मलिकांना सीबीआय नोटीस, जम्मू-काश्मीरमधील विमा योजना गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी पाचारण

काय आहे प्रकरण?

बुधवारी अंगकिता दत्ता यांनी ट्विट करत श्रीनिवास बी.व्ही आणि वर्धन यादव यांच्या छळाचे आरोपे केले होते. “मागील सहा महिन्यांपासून युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही आणि वर्धन यादव माझा छळ करत आहेत. वर्धन यादव यांना महिलेचा सन्मान कसा करायचा हे माहिती नाही. ते मला ‘ये लडकी’ असं म्हणत बोलावतात. ते मला डॉ. अंगकिता दत्ता किंवा आसाम युवक काँग्रेसची अध्यक्ष म्हणून संबोधत नाहीत,” असं अंगकिता दत्ता यांनी म्हटलं होतं.