आसामच्या रातबारी मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश शुक्रवारी निवडणूक आयोगने (ईसी) दिले. शेजारच्या मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या भाजप उमेदवाराच्या पत्नीच्या वाहनातून निवडणूक अधिकारी मतदानानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) घेऊन जात होते, त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आयोगाने फेरमतदानाचा आदेश दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी ते यंत्र घेऊन जात असल्याचा आरोप करणाऱ्या जमावाकडून निवडणूक पथकावर हल्ला होऊ नये यासाठी पोलिसांना या वेळी बळाचा वापर करावा लागला. संबंधित निवडणूक अधिकारी आणि अन्य तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

तथापि, ईव्हीएम सीलबंद असल्याचे आढळले असले तरीही रातबारी येथील १४९ क्रमांकाच्या मतदान केंद्रात फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. याबाबत विशेष निरीक्षकाकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

याबाबत आयोगाने म्हटले आहे की, गुरुवारी मतदानाची वेळ संपल्यानंतर संबंधित अधिकारी  आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या वाहनातून ईव्हीएम घेऊन जात होते,  सशस्त्र सुरक्षा कर्मचारीही त्यांच्यासमवेत होते. त्या वेळी तुफान वृष्टी होत होती आणि वाहन बिघडले.  निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून नवीन वाहन उपलब्ध करून देण्याची विनंती केली. ही व्यवस्था होईपर्यंत  तेथून जाणाऱ्या एका वाहनात ते ईव्हीएमसह बसले, मात्र त्यापूर्वी ते वाहन कोणाच्या मालकीचे आहे ते त्यांनी तपासून पाहिले नाही.

तेथून पुढे जाताच एका जमावाने त्यांना घेरले आणि हे वाहन भाजप उमेदवाराचे असल्याचे जमावातील एकाने सांगितले, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम आढळले, करीमगंजमध्ये हिंसाचार

पीटीआय, करीमगंज/गुवाहाटी

मतदान झालेले इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) भाजपच्या उमेदवाराच्या गाडीतून नेण्यात येत असल्याचे आढळल्यानंतर आसामच्या करीमगंज जिल्ह््यात गुरुवारी रात्री हिंसाचाराचा उद्रेक झाला. त्यामुळे स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.

या घटनेचे शुक्रवारी सकाळी तीव्र पडसाद उमटले, काँग्रेस आणि एआययूडीएफने ईव्हीएमची चोरी झाल्याचा आरोप केला तर निवडणूक आयोगाने (ईसी) याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करून एका मतदान केंद्रावर फेरमतदानाचे आदेश दिले. ईव्हीएम ज्या गाडीतून नेण्यात येत होते ती गाडी शेजारच्या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार के. पॉल यांच्या पत्नीच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले.

भाजप उमेदवाराच्या गाडीतून हे ईव्हीएम फेरफार करण्यासाठी नेण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस आणि एआययूडीएफच्या कार्यकत्र्यांनी केला. या कार्यकत्र्यांनी वाहनाची मोडतोड केली आणि अधिकाऱ्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ईव्हीएम तेथेच टाकून निवडणूक अधिकाऱ्यांना पळ काढावा लागला.

आसाम : ईव्हीएम खेचण्याचा प्रयत्न

पोलिसांनी रबरी गोळ्या झाडल्या, दोन जण जखमी

पीटीआय, कलाईगाव (आसाम)

आसामच्या उदलगुडी जिल्ह््यात जमावाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) खेचण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी रबरी गोळ्यांचा वापर केला, त्यामध्ये दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. भाजप आणि त्यांचा घटक पक्ष असलेल्या यूपीपीएलने गैरप्रकार केल्याचा आरोप जमावाने केल्याचे शुक्रवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

कलाईगावमधील राजा पुखुरी एलपी शाळेत गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. मतदान पार पडल्यानंतर निवडणूक प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात दस्तऐवजावर स्वाक्षऱ्या करण्यावरून खटका उडाला, दोन प्रतिनिधी वगळता अन्य सर्व जण सकाळी उशिरा घटनास्थळी पोहोचले, त्यामुळे त्यांच्या स्वाक्षऱ्या घेता येऊ शकल्या नाहीत. मतदान पार पडल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यानेही त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या नाहीत.

त्यानंतर जवळपास ५०० जणांचा जमाव तेथे गोळा झाला आणि त्यांनी भाजप आणि यूपीपीएलने गैरप्रकार केल्याचा आरोप करून ईव्हीएम खेचून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जमावाला शांत करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरल्याने पोलिसांनी रबरी गोळ्या झाडल्या, त्यामध्ये दोन जण जखमी झाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam evm in private vehicle re poll order abn
First published on: 02-04-2021 at 23:37 IST