त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारीला, तर मेघालय व नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान, ३ मार्चला मतमोजणी

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीचा धुराळा संपत असतानाच निवडणूक आयोगाने ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले. त्यानुसार, त्रिपुरामध्ये १७ फेब्रुवारी, तर मेघालय आणि नागालँडमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मतदान असेल आणि तीन राज्यांची एकत्रित मतमोजणी ३ मार्च रोजी असेल.

मुख्य निवडणूक आयुक्त ए.के. ज्योती यांनी मतदान प्रक्रियेची घोषणा केली. त्रिपुरामध्ये मार्क्‍सवाद्यांची, मेघालयात काँग्रेसची आणि नागालँडमध्ये नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आणि भाजप आघाडीची सत्ता आहे. या तीनपैकी सर्वाधिक उत्कंठा असेल ती त्रिपुराची. सलग २५ वर्षे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ताब्यात असलेले हे राज्य हिसकावून घेण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडले आहे. तेथील मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याची एकही संधी भाजप सोडत नसल्याचे चित्र आहे. भाजपसाठी त्रिपुरातील लढत नुसती राजकीय नाही, तर वैचारिकसुद्धा आहे. राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्याकडे भाजपने त्रिपुराची जबाबदारी सोपविली आहे.

मेघालयमध्ये काँग्रेसचे मुकुल संगमा मुख्यमंत्री आहेत, पण त्यांना तिथे बंडखोरांचा सामना करावा लागत आहे. याही राज्यावर भाजपचा डोळा आहे, पण मेघालय हे तुलनेने ख्रिश्चनबहुल राज्य आहे. तिथे शिरकाव करताना भाजपला अधिक प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी भाजपने अनेक स्थानिक आघाडय़ांना स्वत:बरोबर घेण्याचा प्रयत्न केला आहे. मागील आठवडय़ातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघालयमधील प्रचाराचा शुभारंभ केला होता, तर भाजप अध्यक्ष अमित शहांनी त्रिपुरामध्ये जंगी सभा घेऊन रणशिंग फुंकले होते. नागालँडमध्ये भाजपचा मित्रपक्ष नागा पीपल्स फ्रंटमधील गटबाजीचा मुद्दा अधिक महत्त्वाचा राहील.

ईशान्येमधील आठ राज्यांपैकी भाजपची आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्ये सत्ता आहे, तर सिक्किम व नागालँडमध्ये मित्रपक्षांची सत्ता आहे. त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराममध्ये भाजपला चंचुप्रवेश करता आलेला नाही. त्या दृष्टीने त्रिपुरा व मेघालय या राज्यांवर भाजपने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.