माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळा देश हळहळला. देशाला नवी दिशा देणारा बाप माणूस हरवल्याची भावना प्रत्येकाच्याच मनात होती. अंत्यसंस्कारांच्या आधी त्यांचे पार्थिव स्मृती स्थळ या ठिकाणी आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पार्थिवाला लष्कराच्या तिन्ही दलांकडून सलामी देण्यात आली. तसेच  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि त्यावर पुष्पचक्र अर्पण केले. अटलजींच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी अटलजींच्या चितेला अग्नी दिला.

नमिता भट्टाचार्य यांनी जेव्हा अग्नी दिला तेव्हा सगळेच नेते, उपस्थित हात जोडून उभे राहिले. अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव पंचत्त्वात विलीन झाले. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांचेच डोळे भरून आले होते. अटलजींच्या अस्थिंचे विसर्जन १९ ऑगस्ट रोजी हरिद्वार येथे करण्यात येणार आहे अशीही माहिती समजली आहे.

अटलजींचे पार्थिव शुक्रवारी सकाळी दिल्लीतील निवासस्थानातून भाजपा मुख्यालयात नेण्यात आले. भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र  मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित  शाह, लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, खासदार हेमा मालिनी आदी नेत्यांनी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी दोनच्या सुमारास अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. प्रचंड मोठ्या जनसागरात ही अंत्ययात्रा निघाली होती. त्यानंतर अटलजींचे पार्थिव स्मृती स्थळ या ठिकाणी आणण्यात आले.

वाजपेयी हे ११ जूनपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांना मधुमेहाने ग्रासले होते आणि त्यांचे एकच मूत्रपिंड कार्यरत होते. गेले नऊ आठवडे त्यांच्यावर ‘एम्स’मध्ये उपचार सुरू होते. गेल्या ३६ तासांत त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती. अखेर गुरुवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले.

गुरुवारी रात्री वाजपेयी यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. पक्षाचे नेते, वाजपेयींचे निकटवर्तीय तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाजपेयींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तिथून शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात नेण्यात आले. वाजपेयींचे निवासस्थान ते भाजपा मुख्यालय या मार्गावर वाजपेयींच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. आवडत्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. भाजपा मुख्यालयाबाहेर कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, डीएमकेचे नेते ए राजा यांनी देखील वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

Live Blog

17:00 (IST)17 Aug 2018
अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

तिन्ही राष्ट्रदलाच्या सलामीनंतर, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि दिग्गज नेत्यांनी वाहिलेल्या आदरांजलीनंतर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

16:38 (IST)17 Aug 2018
पार्थिवावरचा तिरंगा झेंडा नातीकडे सोपवला


अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाभोवती गुंडाळलेला तिरंगा झेंडा त्यांची नात निहारीकाकडे सोपवण्यात आला.

16:23 (IST)17 Aug 2018
वाजपेयी यांच्या पार्थिवाला अखेरची सलामी

स्मृती स्थळ या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव आणण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाला अखेरची सलामी देण्यात आली 

16:11 (IST)17 Aug 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली अटलजींच्या पार्थिवाला आदरांजली

अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव स्मृती स्थळावर आणण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. 

15:55 (IST)17 Aug 2018
अटलजींचे पार्थिव स्मृती स्थळावर दाखल

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव स्मृती स्थळ या ठिकाणी आणण्यात आले आहे. आता त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यात येईल. 


15:49 (IST)17 Aug 2018
अटलजींना निरोप देण्यासाठी राहुल गांधीही स्मृती स्थळी

अटल बिहारी वाजपेयी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही स्मृती स्थळ या ठिकाणी आले आहेत. 

15:26 (IST)17 Aug 2018
वाजपेयींना आदर देण्यासाठी युनियन जॅकही अर्ध्यावर

अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रति आदर दाखवत नवी दिल्ली येथील ब्रिटिश मुख्यालयावरचा युनियन जॅक हा ध्वजही अर्ध्यावर आणण्यात आला

14:58 (IST)17 Aug 2018
अटलजींच्या अंत्ययात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत भाजपाचे दिग्गज नेते आणि जनसागर लोटला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेदेखील अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत. 


14:53 (IST)17 Aug 2018
वाजपेयींच्या अंत्ययात्रेत चाहत्यांची गर्दी
14:51 (IST)17 Aug 2018
वाजपेयींच्या अंत्ययात्रेत नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि अन्य नेते वाजपेयींच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले.

14:11 (IST)17 Aug 2018
वाजपेयींच्या अंत्ययात्रेला सुरुवात
14:08 (IST)17 Aug 2018
अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, भाजपा मुख्यालयातून अंत्ययात्रा निघाली, रस्त्यावर चाहत्यांची अलोट गर्दी

14:05 (IST)17 Aug 2018
मुलायम सिंह यादव यांनी वाजपेयींचे अंत्यदर्शन घेतल

मुलायम सिंह यादव यांनी वाजपेयींचे अंत्यदर्शन घेतले.

13:25 (IST)17 Aug 2018
वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी परदेशातील नेते भारतात

भूतानचे राजे, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत पोहोचले, अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे घेणार अंत्यदर्शन, ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तांनीही घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन 

13:01 (IST)17 Aug 2018
वाजपेयींसारख्या नेत्याची देशाला गरज : सीताराम येचुरी

अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखी विचारधारा असलेल्या नेत्याची देशाला गरज आहे. राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी माणूसकीला कधी धक्का लागू दिला नाही - सीताराम येचुरी

12:57 (IST)17 Aug 2018
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाजपेयींचे अंत्यदर्शन घेतले
12:44 (IST)17 Aug 2018
हेमा मालिनी यांनी वाजपेयींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले

ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी दिल्लीत वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

12:43 (IST)17 Aug 2018
वाजपेयी सर्वांसाठी आदर्श : मधूर भांडारकर

मी अटल बिहारी वाजपेयींना २००६ मध्ये भेटले होतो. ते उत्तम वक्ते होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. ते सर्वांसाठीच आदर्श होते. कविता, भाषण आणि नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली : मधूर भांडारकर

12:40 (IST)17 Aug 2018
उद्धव ठाकरे दिल्लीत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

12:40 (IST)17 Aug 2018
लालकृष्ण आडवाणी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. अंत्यदर्शन घेताना आडवाणी भावूक

11:54 (IST)17 Aug 2018
अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनासाठी नेत्यांची रीघ

डीएमके नेते ए राजा, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, मणिपूरचे मुख्यमंत्री वीरेन सिंह यांनी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

11:19 (IST)17 Aug 2018
नरेंद्र मोदींनी घेतले अंत्यदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा मुख्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

11:17 (IST)17 Aug 2018
अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात

अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात पोहोचले, दुपारी एक वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुख्यालयात ठेवणार

11:12 (IST)17 Aug 2018
मोदी, शाह आणि योगी आदित्यनाथ भाजपा मुख्यालयात

भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ व अन्य नेते

10:49 (IST)17 Aug 2018
भाजपा मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

भाजपा मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी, पंतप्रधान नरेंद्र मोदींही मुख्यालयात, थोड्याच वेळात अटलबिहारी वाजपेयी यांचे पार्थिव मुख्यालयात पोहोचणार

10:23 (IST)17 Aug 2018
वाजपेयींच्या अंत्ययात्रेत नागरिकांची गर्दी

वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी

10:05 (IST)17 Aug 2018
अटलजींचं पार्थिव भाजप मुख्यालयाकडे रवाना

आज दुपारी ४ वाजता अटलजींवर अंत्यसंस्कार होणार

09:44 (IST)17 Aug 2018
चंद्राबाबू नायडूंनी घेतले अटलबिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

09:43 (IST)17 Aug 2018
राहुल गांधी वाजपेयींच्या निवासस्थानी

राहुल गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

09:41 (IST)17 Aug 2018
अजित डोवाल वाजपेयींच्या निवासस्थानी

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

09:39 (IST)17 Aug 2018
लष्करप्रमुख बिपीन रावत यांची अटलबिहारी वाजपेयींना मानवंदना

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पुष्पचक्र अर्पण करत वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली

09:33 (IST)17 Aug 2018
मोहन भागवत यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

मोहन भागवत यांनी दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

09:29 (IST)17 Aug 2018
जावेद अख्तर आणि शबाना आझमी दिल्लीत पोहोचले

जावेद अख्तर आणि शबाना आझमी दिल्लीत वाजपेयी यांच्या निवासस्थानी

09:26 (IST)17 Aug 2018
केरळचे राज्यपाल दिल्लीत

केरळच्या राज्यपालांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

समन्वयवादी राजकारणाने वाजपेयी यांनी पक्षीय अभिनिवेशाच्या भिंती तोडल्या होत्या. पंतप्रधानपदाची संपूर्ण पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे ते देशातील पहिले बिगरकाँग्रेसी नेते होते. स्वातंत्र्य आंदोलनापासून आणीबाणीतील तुरुंगवासापर्यंत त्यांचे सामाजिक आणि राजकीय जीवन अनेक चढउतारांचे होते. काँग्रेससारखा बलाढय़ पक्ष आणि इंदिरा गांधी यांच्यासारख्या प्रभावी नेत्या यांच्या विरोधात उभे ठाकून आणि त्यासाठी तुरुंगवास भोगूनही त्यांच्या मनाला कटुतेचा स्पर्शही नव्हता. लोकशाही मूल्यपरंपरांची जपणूक करण्यासाठी ते अत्यंत आग्रही असत. देशातील सर्वधर्मिय आणि सर्वभाषिक जनतेच्या मनात त्यामुळेच त्यांनी विश्वासाचे स्थान मिळवले होते.