नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाशी संगनमत करून भाजपने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २५ जागा केवळ ३३ हजारांच्या मताधिक्याने जिंकल्या आणि या जागांमुळेच मोदी सत्तेवर टिकून राहिले, अशी टीका त्यांनी केली. केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजप संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच नष्ट करत आहेत. आता न्यायालयाने हस्तक्षेप केला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवरच केंद्रीय निवडणूक आयोगाने कब्जा केल्याचा महाविकास आघाडीला संशय आला होता. त्यानंतर काँग्रेसने सुमारे सहा महिने प्रचंड कष्ट करून पुरावे गोळा केले व त्याचे विश्लेषण केले. कर्नाटकच्या लोकसभा मतदारसंघांतील मतदार याद्यांच्या कागदपत्रांची उंची सात फूट इतकी मोठी आहे. या कागदांच्या जंजाळातून प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची पडताळणी करावी लागते. हे काम किती कष्टाचे आहे हे लक्षात येईल. म्हणूनच केंद्रीय निवडणूक आयोग डिजिटल माहिती-विदा उपलब्ध करून देत नाही. कित्येक वर्षांचा माहिती-विदा एका पेनड्राइव्हमध्ये साठवता येतो तर मतदार याद्या का साठवता येत नाहीत? काँग्रेसला डिजिटल मतदार यादी दिली असती तर देशभरातील मतांची चोरी आम्ही काही सेकंदांतच पकडू शकलो असतो. आपले पितळ उघडे पडण्याची भीती केंद्रीय निवडणूक आयोगाला वाटत असल्यामुळेच विश्लेषण करता येईल अशा स्वरूपात माहिती-विदा दिला जात नाही. ही माहिती-विदाही नष्ट करण्याचा प्रयत्न केंद्रीय निवडणूक आयोग करत आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.

महादेवपुराच्या मताधिक्याचा मार्ग

बेंगळूरु मध्य मतदारसंघामध्ये भाजपला मिळालेल्या ६.५ लाख मतदारांपैकी १ लाख २५० मतांची चोरी झाली. महादेवपुरा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला १ लाख १४ हजार ४६ मताधिक्य मिळाले. पाच अवैध मर्गांनी मतांची चोरी झाल्यामुळेच महादेवपुरा मतदारसंघामध्ये भाजपला मताधिक्य मिळाल्याचा आरोप राहुल यांनी केला.

  • नकली (डुल्पिकेट) मतदार- ११ हजार ९६५०
  • चुकीचे पत्ते- ४० हजार ९०
  • एकाच पत्त्यावर अनेक मतदार- १० हजार ४५२०
  • अवैध छायाचित्रे- ४ हजार १३२०
  • नवे मतदार-६ क्रमांकाच्या अर्जाचा गैरवापर- ३३ हजार ६९२०
  • एकूण मतांची चोरी-१ लाख २५०

मतांच्या चोरीचे दाखले

– गुरकिरत सिंह डांग या एकच मतदाराचे नाव चार मतदान केंद्रांच्या याद्यांमध्ये होते, या मतदाराने वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदान केले. अशा बनावट मतदानातून ११ हजार मतांची चोरी झाली.

– आदित्य श्रीवास्तव या मतदाराचे नाव कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यांतील मतदार केंद्रांवर नोंदवलेले होते. या मतदाराचे नाव, पत्ता एकसारखाच होता पण, वेगवेगळ्या मतदार केंद्रांमधील याद्यांमध्ये त्याचा समावेश होता.

– अनेक मतदारांच्या पत्त्यावर शून्य असे लिहिलेले आहे. त्यांचा निवासाचा पत्ताच उपलब्ध नाही. अनेक मतदारांच्या वडिलांचे नाव ‘डीएफओआयजीजीआयडीएफ’ असे लिहिलेले आहे.

– एकाच पत्त्यावर अनेकांची नावे आहेत. घर क्रमांक ३५ मधील एका खोलीच्या निवासस्थानी ८० मतदार राहात असल्याचे दाखवलेले आहे.

– सुमारे ४ हजार मतदारांच्या अधिकृत यादीमध्ये छायाचित्रेच नाहीत. काहींची छायाचित्रे ओळखताही येत नाहीत इतकी छोटी आहेत.

– नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी अर्ज क्रमांक ६ वापरला जातो. यात अनेक नवे मतदार ६५ ते ९५ वर्षे वयागटातील आहेत. नवे मतदार १८-२५ वयोगटातील असतात, या वयोगटातील एकही मतदार आढळला नाही.

महाराष्ट्राच्या निकालातून धडा

महाराष्ट्रात लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या ५ महिन्यांमध्ये १ कोटी मतदार वाढले, ते अचानक कुठून आले, याबाबत संशय व्यक्त केला गेला आहे. महाराष्ट्रातील मतदार याद्यांतील आणि मतदानातील घोळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने डिजिटल स्वरूपातील मतदार यादी उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण होते. शिवाय, सीसीटीव्ही फुटेजही दिले पाहिजे. हे फुटेज ४५ दिवसांमध्ये नष्ट करण्याचा निर्णय कशासाठी घेतला गेला हे स्पष्टच दिसते, असे राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्रातील विधानसभा निकालांनंतर राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता व यासंदर्भात ‘लोकसत्ता’मध्ये लेख लिहून देशाचे लक्ष वेधून घेतले होते. संध्याकाळी पाच वाजल्यानंतर मतदानामध्ये मोठी वाढ झाल्याचे सांगितले गेले. पण, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या मतदान केंद्रांवरील प्रतिनिधींना वस्तुस्थितीत तफावत दिसली. रांगा लावून इतके प्रचंड मतदान झाले नसल्याचे त्यांना आढळल्याचा दावा राहुल यांनी केला.