विशाखापट्टणम
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मतदारसंघात या वेळी तेलुगू देसमचे एम. श्री. भारत व वायएसआर काँग्रेसचे एम.व्ही.व्ही. सत्यनारायण यांच्यात लढत आहेत. गेल्या वेळी भाजपच्या के. हरिबाबूंनी येथून विजय मिळवला होता. २०१४ मध्ये तेलुगू देसमशी भाजपची आघाडी होती. यंदा भाजपने माजी केंद्रीय मंत्री व्ही. पुरंदरेश्वरी यांना उमदेवारी दिली आहे. मात्र आंध्र प्रदेशातील सध्याची राजकीय स्थिती पाहता तेलुगू देसम व वायएसआर काँग्रेस यांच्यात लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीतही झुंज आहे. इतर पक्षांचा फारसा प्रभाव नाही. विजयनगरम व विशाखापट्टणम जिल्ह्य़ांचा मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. आतापर्यंत नऊ वेळा येथून काँग्रेसने विजय मिळवला आहे. काँग्रेसचा प्रभाव असलेला हा मतदारसंघ होता. या वेळी काँग्रेसने पी. रामनी कुमारी या महिला आघाडीच्या प्रमुखांना संधी दिली आहे. याखेरीज जनसेना पक्षाकडून केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी संचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांना उमेदवारी दिली आहे. कापू व खम्मा या प्रमुख जातींमध्ये येथे निवडणुकीत नेहमी सुप्त संघर्ष असल्याचे चित्र असते.