इंडोनेशियाचे अध्यक्ष सुशिलो बामबांग युधोयोनो, त्यांची पत्नी व निकटच्या सहकाऱ्यांची हेरगिरी करण्यात आली असून, त्यात ऑस्ट्रेलियाचा सहभाग उघड झाला आहे. या घटनेमुळे इंडोनेशिया हा देश संतप्त झाला असून, त्यांनी त्यांचा राजदूत ऑस्ट्रेलियातून माघारी बोलावले आहे.
अमेरिकेचा जागल्या कार्यकर्ता एडवर्ड स्नोडेन याने मिळवलेल्या कागदपत्रात हेरगिरीचे प्रकरण उघड झाले असून त्याची माहिती एबीसी या वृत्तसंस्थेने दिली होती. गार्डियन ऑस्ट्रेलिया या देशाच्या गुप्तचर संस्थेने इंडोनेशियाचे अध्यक्ष युधोयोनो यांचे दूरध्वनीवरील संभाषण अनेकदा चोरून ऐकले. स्नोडेनला मिळालेल्या कागदपत्रानुसार हेरगिरी करणाऱ्या संस्थेने ऑगस्ट २००९ मध्ये त्यांच्या मोबाइल फोनवर लक्ष ठेवून त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली. इंडोनेशियात ऑस्ट्रेलिया हेरगिरी करीत असल्याचे दावे अनेकदा करण्यात आले असून ते आता खरे ठरले आहेत. संतप्त झालेल्या इंडोनेशियाने ऑस्ट्रेलियातील आपल्या राजदूताला माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्रमंत्री मार्टी नतालेगावा यांनी सांगितले, की स्नोडेन याने म्हटल्यानुसार ऑस्ट्रेलियाने इंडोनेशियाचे अध्यक्ष, त्यांची पत्नी, वरिष्ठ मंत्री या सर्वाना लक्ष्य बनवले आहे. ऑस्ट्रेलियातील राजदूतास सल्लामसलतीसाठी मायदेशी बोलावण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने याबाबत स्पष्टीकरण करावे अशी मागणी इंडोनेशियाच्या अध्यक्षांचे प्रवक्ते तेकू फैझाशा यांनी ट्विटरवर म्हटले आहे. या कृतीमुळे बरीच हानी झाली आहे. आता पुन्हा विश्वास निर्माण करावा लागेल. एबीसी वृत्तसंस्थेने म्हटले आहे, की डिफेन्स सिग्नल्स डायरेक्टोरेट या संस्थेची कागदपत्रे स्नोडेनला मिळाली आहेत. त्यातील पत्रावर शेवटी असा शिक्का मारला आहे, की त्यांची गुपिते उघड करा व आपली सुरक्षित ठेवा. उपाध्यक्ष बोडियोनो व माजी उपाध्यक्ष युसूफ कल्ला, परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते व सुरक्षामंत्री व माहितीमंत्री यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनी सांगितले, की सर्वच सरकारे अशी माहिती गोळा करतात, प्रत्येक सरकारला दुसरे सरकार अशी माहिती गोळा करते हे माहीतच असते.
परराष्ट्रमंत्री ज्युली बिशप यांनी सांगितले, की कुठल्याही संबंधात अशी आव्हाने असतातच.