Australia PM Anthony Albanese on Senator Jacinta Nampijinpa Price : ऑस्ट्रेलियामधील एका खासदाराने भारताविरोधात केलेल्या टिप्पणीमुळे त्यांना भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. आल्बनीज म्हणाले, “उजव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षाच्या खासदार जॅसिंटा नम्पिजिनपा प्राइस यांनी त्यांच्या भारतविरोधी वक्तव्याबद्दल माफी मागायला हवी. प्राइस यांच्या वक्तव्यामुळे ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत.”
ऑस्ट्रेलियात नुकतंच स्थलांतरितांविरोधात एक आंदोलन झालं. त्यानंतर त्या आंदोलनावर टिप्पणी करताना लिबरल पार्टीच्या खासदार जॅसिंटा प्राइस यांनी भारतीयांविरोधात वक्तव्य केलं. देशातील वाढत्या महागाईसाठी त्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीयांना जबाबदार ठरवलं. तसेच प्राइस म्हणाल्या होत्या की “आल्बनीज यांचं डावं सरकार मोठ्या संख्येने भारतीयांना या देशात राहू देत आहे, कारण इथे राहणारे भारतीय त्यांची मतपेढी भरायचं काम करतात.”
जॅसिंटा प्राइस नेमकं काय म्हणाल्या होत्या?
रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्राइस म्हणाल्या की “मला इथे राहणाऱ्या भारतीय समुदायाबद्दल चिंता आहे. कारण ते मोठ्या संख्येने ऑस्ट्रेलियात येत आहेत. हा समुदाय लेबर पार्टीला मतदान करतो.” प्राइस यांच्या वक्तव्यामुळे ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच लेबर पार्टीने देखील प्राइस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी प्राइस यांनी माफी मागावी अशी मागणी लेबर पार्टीने केली आहे.
प्राइस यांनी माफी मागावी : पंतप्रधान अल्बानीज
लेबर पार्टीपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी देखील प्राइस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी नुकतीच ऑस्ट्रेलियातील सरकारी वृत्तसंस्था एबीसीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, “प्राइस यांच्या वक्तव्याने येथील भारतीय समुदाय दुखावला गेला आहे. खासदार प्राइस यांनी केलेल्या टिप्पण्या खऱ्या नाहीत. त्यासाठी त्यांनी माफी मागायला हवी. त्यांच्या पक्षातील लोकांनाही त्यांचं हे वक्तव्य पटलेलं नाही. त्यामुळे त्यांनाही वाटत असेल की प्राइस यांनी माफी मागावी.”
ऑस्ट्रेलियात किती भारतीय राहतात?
शासकीय आकडेवारीनुसार २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियात ८,४५,८०० भारतीय वंशाचे नागरिक राहत होते. ही संख्या मागील दशकातील भारतीयांच्या संख्येपेक्षा दुप्पट आहे. तसेच गेल्या दोन वर्षांत यात आणखी भर पडली असून ऑस्ट्रेलियातील भारतीयांची संख्या नऊ लाखांच्या आसपास गेली असल्याचं सांगितलं जात आहे.