चेंडूत फेरफार करण्याच्या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटला उतरती कळा लागली होती. मात्र आता गेल्या १० महिन्यांची मरगळ आम्ही झटकली असून पूर्वीच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा विद्यमान संघ बलाढय़ वाटत आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी आहे, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने सांगितले.
‘‘१० महिन्यांपूर्वी कुणी आम्ही विश्वचषक जिंकू, असे सांगितले असते तर उत्तर नकारार्थीच आले असते. पण गेल्या काही महिन्यांपासून आम्ही चांगल्या पद्धतीने संघाची जडणघडण केली आहे. १ मेपासून आम्ही एकत्र असून विश्वचषकाच्या तयारीसाठी कसून मेहनत घेत आहोत. आम्ही दोन्ही सराव सामने जिंकले असले तरी मुख्य स्पर्धेतही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करू,’’ असेही फिंच म्हणाला.