Avimukteshwaranand शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना मालेगाव स्फोट आणि भगवा दहशतवाद या मुद्द्यांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. दहशतवाद आणि रंग यांचा काय संबंध? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मागच्या आठवड्यातच मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला. त्यावेळी सर्व आरोपींची पुराव्यांच्या अभावी मुक्तता करण्यात आल्याचं न्यायालयाने जाहीर केलं. या आरोपींनी स्फोट घडवला हे एनआयएला सिद्ध करता आलेलं नाही त्यामुळे सगळ्या आरोपींची सुटका करण्यात येत आहे असं न्यायालयाने म्हटलं आहे. मालेगाव स्फोटानंतर भगवा दहशतवाद हा शब्द चर्चेत आला होता. दरम्यान याबाबतच्या प्रश्नावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भगवा दहशतवादी असेल तर त्याची पूजा करणार का?-अविमुक्तेश्वरानंद
“दहशतवादी हा दहशतवादी असतो, भगवा दहशतवादी असेल तर त्याची पूजा करणार का? कुठलाही रंग असो तो दहशतवादी असेल तर तुम्ही त्याची पूजा करणार का? जर भगवा रंग असेल तर अपमान करणार का? रंगाचा काय संबंधच काय? दहशतवाद हा दहशतवाद असतो त्यात रंगाचा काही प्रश्नच येत नाही आणि दहशतवादाच्या विरोधात शून्य सहनशक्तीचं धोरणच अवलंबलं पाहिजे.” असं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलंय.
दोषी आरोपी सापडत कसे नाहीत? अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पुढे म्हणाले, “दहशतवादी येतात आणि स्फोट करुन जातात. त्यातले दोषी कोण ते तुम्हाला शोधता येत नाही. २००६ मध्ये मुंबईत सात साखळी बॉम्बस्फोट झाले त्यातले आरोपी अजूनही शोधता आलेले नाहीत. मालेगाव स्फोट प्रकरणातले आरोपी कोण शोधता आले नाहीत. अपयश लपवण्यासाठी सरळ भगवा दहशतवाद वगैरे गोष्टी करता. दहशतवादाचा कुठला रंग असतो का? रंग आयुष्याचे असतात. मेल्यानंतर तुमचे डोळे रंग पाहू शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याचा फोटोही रंगीत नसतो, तो कृष्ण धवलच असतो. चित्रपट बघा, फ्लॅशबॅक दाखवण्यासाठी कृष्ण धवल रंगांचा वापर करतात. दहशतवादाचा रंग नसतो. तो रंग काळा, हिरवा, निळा कुठलाच नसतो. दहशतवादात रंग शोधणारे दहशतवादाच्याबाबतीत पक्षपाती आहेत.” असं मला वाटतं असंही परखड विधान अविमुक्तेश्वरानंद यांनी केलं आहे.
हिंदी भाषेबाबत काय म्हणाले अविमुक्तेश्वरानंद?
“हिंदी भाषेला कधी ओळख मिळाली? मराठीला ओळख कधी मिळाली याचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं की हिंदी भाषेला आपल्या देशात राजभाषा म्हणून आधी ओळख मिळाली आहे. १९६० मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्य तयार झालं तेव्हा मराठी भाषेला राज्यभाषा म्हणून ओळख मिळाली” असं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटलं आहे.