अतिसंवेदनशील असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी जमीनवाद प्रकरणावर नोव्हेंबर महिन्यांत सुप्रीम कोर्टाचा निकाला येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून अयोध्येमध्ये रविवारी १४४ कलम लागू करण्यात आले असून त्यानुसार, १० डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे लागू असणार आहे.

स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वांत मोठा आणि अतिसंवेदनशील खटला असून याचा निकाल १७ नोव्हेंबरपूर्वी येणार आहे. कारण, या खटल्याची सुनावणी ज्या खंडपीठासमोर सुरु आहे त्या खंडपीठाचे अध्यक्ष सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून अयोध्येत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे १० डिसेंबरपर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना अयोध्येत कुठेही कोणत्याही कारणासाठी एकत्र येता येणार नाही. त्याचबरोबर या काळात टीव्हीवरील चर्चांनाही बंदी घालण्यात आली असून २०० शाळाही १० डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर १० डिसेंबरपर्यंत अयोध्येत १४४ कलम लागू राहणार आहे. आगामी दिवाळी आणि गोवर्धन या सणांच्या काळातही हे कलम लागू राहणार आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी नुकतीच सुप्रीम कोर्टाकडे वादग्रस्त जमिनीवर दिवा लावण्याची परवानगी मागितली आहे. त्यावर जर हिंदूंना येथे दिवा लावण्याची परवागनी मिळाली तर आम्हालाही येथे नमाज अदा करण्यासाठी परवानगी मिळायला हवी, अशी मागणी मुस्लिम पक्षांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर तणावाचा वातावरण निर्माण होऊ कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे टाइम्सनाऊने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रीम कोर्टात सध्या या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरु असून आज सुनावणीचा ३८वा दिवस आहे. येत्या १८ ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी केवळ चारच दिवस बाकी आहेत. यामध्ये दोन दिवस मुस्लिम पक्षकारांना तर उर्वरित दोन दिवस हिंदू पक्षकारांना बाजू मांडण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील चार आठवड्यात यावर ऐतिहासिक निकाल देण्यात येणार आहे.