राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर देशभरातून अनेकांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने देखील या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ज्या पद्धतीने देशवासीयांनी स्वीकारला त्याबद्दल कैफने हे केवळ भारताताच घडू शकतं, असं म्हटलं आहे. ट्विटद्वारे त्यांनी निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

”हे केवळ भारतातच घडू शकतं, जिथं न्यायमूर्ती अब्दुल नजीर हे एकमताने दिलेल्या निर्णयाचा एक भाग आहेत आणि के के मोहम्मद यांनी ऐतिहासिक पुरावे सादर केले. भारताची संकल्पना ही कुठल्याही विचारसरणीपेक्षा मोठी आहे, हेच यातून दिसून आले. या निकालावर सर्वजण समाधानी असतील अशी अपेक्षा आहे, यानिमित्त मी शांतता, प्रेम व सलोख्यासाठी प्रार्थना करतो.” असे मोहम्मद कैफने ट्विटमध्ये म्हटले आहे.

अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने  निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी याआधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. बाकी सगळे वादी प्रतिवादी अग्राह्य ठरवत केवळ रामलल्ला व सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढवण्याचा हक्क सुप्रीम कोर्टानं मान्य केला. यामुळे सर्व वादग्रस्त जागेवर रामलल्लाचा हक्क असल्याचं  सर्वोच्च न्यायालयाने  आहे.