लष्कराविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याची तक्रार
लष्कराविरुद्ध अपमानास्पद उद्गार काढल्याबद्दल समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान यांचे शिर व जीभ कापून आणणाऱ्याला बक्षीस दिले जाईल, असे हिंदुत्ववादी संघटनांनी जाहीर केले आहे.
रामपूरच्या चांदपूर व सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यांमध्ये खान यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मेरठमध्ये बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशच्या या वादग्रस्त मंत्र्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
देशद्रोह, बंडाला प्रोत्साहन देणे आणि सार्वजनिक स्वरूपाचा खोडसाळपणा करणे या आरोपांखाली आझम खान यांच्याविरुद्ध चांदपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे ठाणेदार अजय कुमार सिंह यांनी सांगितले. विहिंपचे नेते अनिल पांडेय यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा उद्योग संघटनेचे अध्यक्ष आकाश सक्सेना यांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दुसरा एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती तेथील ठाणेदार राजेश कुमार सोळंकी यांनी दिली.
‘सुरक्षा दलांनी केलेल्या अत्याचारांमुळे काही भागात महिलांनी लष्करी जवानांची गुप्तांगे छाटली’, असे वादग्रस्त वक्तव्य सपच्या या नेत्याने केले होते.
दरम्यान, आझम खान यांची जीभ कापून आपल्याला आणून देणाऱ्यास विहिंपचे जिल्हा सचिव राजेश कुमार अवस्थी यांनी ५० हजार रुपयांचे इनाम जाहीर केले. तर खान हे ‘दहशतवादी’ असल्याचे सांगून त्यांचे शिर आणून देणाऱ्यास ५१ लाख रुपयांचे इनाम देण्याचे गोरक्षाप्रमुख मुकेश पटेल यांनी जाहीर केले आहे. याबाबत खान यांच्या समर्थकांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.