Air India Express Plane Mid-Air Baby Born: मस्कतहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात एक दुर्मिळ घटना घडली आहे. एका थाई गर्भवती महिलेला विमानातच प्रसूती वेदना झाल्या. त्यामुळे विमान हवेत असतानाच गर्भवती महिलेचे बाळंतपण करावे लागले. केबिन क्रू सदस्य आणि एका नर्सच्या मदतीने थाई महिलेची सुखरूप प्रसूती झाली असून बाळ निरोगी असल्याची माहिती एअर इंडियाच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.
थाई महिलेला जेव्हा प्रसूती वेदना जाणवू लागल्या तेव्हा विमान कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करत बाळंतपणाची तयार केली. बाळाचा जन्म होण्यासाठी एका बाजूला सुरक्षित वातावरण निर्माण केले. केबिन क्रू सदस्यांना दिलेले कठोर प्रशिक्षण या संकटकाळात कामी आले आणि त्यांनी परिस्थिती प्रभावीपणे हाताळली. नवजात बाळ आणि आईला सुरक्षा प्रदान करण्यात केबिन क्रू सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे एअर इंडियाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रसूती झाल्यानंतर वैमानिकाने मुंबई विमानतळावरील एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क साधत सदर विमान प्राधान्याने उतरविण्याची विनंती केली. यामुळे विमान लँड होताच तातडीने वैद्यकीय मदत मिळू शकली. यातून एअर इंडियाने संकट परिस्थिती प्रभावीपणे हाताळल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
विमान विमानतळावर उतरताच आई आणि बाळाला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी एअर इंडियाचे काही कर्मचारीही थाई प्रवाशाबरोबर रुग्णालयात पुढील मदतीसाठी गेले होते. या संपूर्ण प्रक्रियेत प्रवाशाला अडचणीचा सामना करावा लागणार नाही, याची खबरदार विमान कंपनीने घेतली.
हा संपूर्ण प्रसंग टीमवर्क आणि करुणा यांचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे एअर इंडिया एक्सप्रेसने म्हटले आहे. तसेच संबंधित थाई प्रवाशाला मायदेशी पाठविण्यासाठी एअर इंडियाकडून थायलंडच्या वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.
जूनमध्ये अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यापासून एअर इंडियाबाबत अनेक उलटसुलट बातम्या समोर येत होत्या. पण मस्कत-मुंबई एअर इंडिया एक्सप्रेसमधील सुखरुप बाळंतपणाची बातमी एअर इंडिया आणि सर्व विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंद देणारी आहे.