पीटीआय, ढाका

बांगलादेश मुक्तिसंग्रामात भारतीय सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढल्याबद्दल बांगलादेशच्या हंगामी सरकारचे कायदा सल्लागार आसिफ नझरुल यांनी टीका केली आहे. ‘‘भारत त्या युद्धामध्ये केवळ एक मित्र देश होता, आणखी काही नाही,’’ असा घमेंडखोर दावा नझरुल यांनी फेसबुक पोस्टमध्ये केला आहे.

भारताने १९७१च्या युद्धात पाकिस्तावर विजय मिळवून बांगलादेशच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी १६ डिसेंबरला विजय दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहिले होते की, ‘‘आज विजय दिवसाच्या निमित्ताने, आम्ही १९७१मधील भारताच्या ऐतिहासिक विजयामध्ये योगदान दिलेल्या शूर सैनिकांचे धाडस आणि त्याग यांचा गौरव करतो. त्यांचे निस्वार्थी समर्पण आणि अढळ संकल्प यांनी देशाचे संरक्षण केले आणि आम्हाला सन्मान मिळवून दिला. आजचा दिवस त्यांच्या अतुलनीय शौर्याला आदरांजली वाहण्याचा आहे.’’

हेही वाचा >>>Amit Shah : “काही जण ५४ व्या वर्षी स्वतःला युवा नेता म्हणतात”, अमित शाह यांची राहुल गांधींवर खोचक टीका

नझरुल यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट सामायिक केला आणि बंगालीमध्ये निषेधात्मक पोस्ट लिहिली. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांगलादेशच्या निर्मितीमध्ये झाली होती. भारताने युद्ध जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या ९० हजार सैनिकांनी शरणागती पत्करली होती. ‘वंगबंधू’ नावाने लोकप्रिय असलेले शेख मुजिबुर रहमान यांनी बांगलादेश मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व केले होते. त्यांची कन्या शेख हसीना या ५ ऑगस्टला पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्या आहेत.

मोहम्मद युनुस यांचा नझरुलना पाठिंबा

बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनुस यांच्या कार्यालयाने नझरुल यांची प्रतिक्रिया रिपोस्ट केली. त्यांचे माध्यम सचिव शफिकुल आलम यांनी नझरुल यांची पोस्ट सामायिक केल्याचे वृत्त बांगलादेशच्या ‘द डेली स्टार’ या वर्तमानपत्राने मंगळवारी दिले. युनुस यांनी सोमवारी ‘विजय दिवसा’निमित्त भाषण करताना मुजिबुर रहमान यांचा उल्लेख टाळला होता. तसेच शेख हसीना जगातील सर्वात वाईट हुकूमशहा असल्याची टीका केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१६ डिसेंबर १९७१ हा बांगलादेशचा विजय दिवस आहे. त्या विजयामध्ये भारत केवळ एक मित्रदेश होता, त्यापेक्षा जास्त काही नाही. – आसिफ नझरुल, कायदा सल्लागार, हंगामी सरकार