पश्चिम बंगालमधील राणाघाट शहरातील एका कॉन्व्हेंटमधे दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दरोडय़ाच्या दरम्यान सत्तरीतील एका जोगिणवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्य़ासाठी एका बांगलादेशी इसमाला कोलकात्यातील न्यायालयाने बुधवारी मरेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता.

बांगलादेश सीमेला लागून असलेल्या नादिया जिल्ह्य़ाच्या राणाघाट शहरातील जीजस अँड मेरी कॉन्व्हेंटमधे १४ मार्च २०१५ रोजी झालेल्या या घटनेच्या संदर्भात, दरोडा आणि जोगिणवर बलात्कार यांच्या वेगवेगळ्या आरोपांखाली नझरूल इस्लाम, मिलन कुमार सरकार, ओहिदुल इस्लाम, मोहम्मद सलीम शेक, खालेदार रहमान व गोपाल सरकार या सहाही आरोपींना अतिरिक्त सत्र न्यायाधीश कुमकुम सिन्हा यांनी मंगळवारी दोषी ठरवले होते.

अभियोजन पक्षाने सर्व सहा जणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप ठेवला असला, तरी हा आरोप सिद्ध झाला नाही आणि केवळ नझरूलला बलात्कारासाठी दोषी ठरवण्यात आले. नझरूलसह सर्व सहाही आरोपींना दरोडा घालण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याबद्दल न्यायाधीशांनी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला असून तो न भरल्यास त्यांना आणखी अडीच वर्षांची कैद भोगावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दंडापोटी गोळा करण्यात आलेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम बलात्काराची शिकार ठरलेल्या ननला दिली जाईल आणि तिने ती स्वीकारण्यास नकार दिल्यास ही रक्कम कॉन्व्हेंटला दिली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.