नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँका आणि कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेने सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार, येत्या २८ डिसेंबरला ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येतील. त्यानंतर बँक संघटनांतर्फे २९ डिसेंबरला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना निवेदन देण्यात येणार आहे.
संघटनेचे सदस्य २ आणि ३ जानेवारी रोजी ठिकठिकाणी निदर्शने करतील. आमच्या संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार, आमच्या संघटनेच्या शाखांनी सर्व प्रमुख केंद्रांवर निदर्शने करण्याची तयारी सुरू केलेली आहे, अशी माहिती अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेचे सरचिटणीस एस. नागराजन यांनी दिली. रिझर्व्ह बँकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येईल. सर्व बँका आणि शाखांना देण्यात येणाऱ्या रोकडचे प्रमाण निश्चित केले जावे, तसेच सर्व एटीएम मशीनमध्ये पुरेसे पैसे टाकण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे, असेही त्यांनी सांगितले. बँकांना देण्यात येणाऱ्या रोकडबाबत पारदर्शक धोरण बनवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
नोटाबंदीनंतर ज्या व्यक्तींचा आणि सेवेत असताना कामाच्या ताणामुळे ज्या बँक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. नोटाबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक बँकांतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी सरकारने आणि आरबीआयने द्यावी, बँकेत उशिरापर्यंत थांबून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना त्याचा मोबदला देण्यात यावा, अशाही मागण्या संघटनांनी केल्या आहेत. दरम्यान, दोन्ही संघटनांचे देशभरातील नऊ लाख बँकांमधील साडेपाच लाख सदस्य आहेत.