Mohan Bhagwat on Pahalgam Terror Attack: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. “ही लढाई पंथ किंवा धर्माची नसून धर्म आणि अधर्मामधली आहे”, अशी प्रतिक्रिया मोहन भागवत यांनी दिली आहे. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३व्या स्मृतिदिन सोहळ्याच्या निमित्ताने विलेपार्ले येथे पुरस्कार सोहळ्यात बोलत असताना त्यांनी दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने त्यांनी आपली भूमिका मांडली.

आपल्या भाषणात मोहन भागवत पुढे म्हणाले की, सध्या जी लढाई सुरू आहे. ती धर्म किंवा पंथामधील लढाई नाही. तर ती धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे. आमचे सैनिक किंवा इतर लोक हे कुणालाही त्यांचा धर्म विचारून मारणार नाहीत. हिंदू असे कधीही करणार नाही.

“दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. त्यात कुणीही जात-धर्म-पंथ पाहिला नाही. हे जर नेहमी झाले तर आपल्याकडे वाकडा डोळा करून पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही आणि जर कुणी पाहिलेच तर डोळा फुटेल”, असे मोहन भागवत म्हणाले.

मोहन भागवत पुढे म्हणाले, “आपण असे लोक आहोत, जे प्रत्येकामध्ये चांगले पाहतो आणि ते स्वीकारतो. आज आपल्याकडे लष्कर आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा आपल्याला सैन्याची गरज वाटली नाही. युद्ध होणार नाही म्हणून आपण निश्चिंत राहिलो आणि मग १९६२ साली आपल्याला धडा मिळाला. तेव्हापासून आपण आपल्या लष्कराची ताकद वाढवत आलो आहोत. दृष्टांचा नाश झालाच पाहिजे. आज याबद्दल देशात संताप तर आहेच पण मोठ्या अपेक्षाही आहेत. या अपेक्षा पूर्ण होतील, अशी आशा करूयात.”

प्रत्येकाने संघात असलेच पाहीजे असे नाही

आपल्या भाषणात मोहन भागवत यांनी मंगेशकर कुटुंबाच्या योगदानाचे कौतुक केले. “कलेच्या माध्यमातून त्यांनी देशसेवा केलीच. पण त्यांच्यात प्रखर राष्ट्रभक्तीही होती. प्रत्येकाने प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे देशसेवा करायला हवी. यासाठी प्रत्येकाने संघातच गेले पाहिजे किंवा राष्ट्रीय पक्षातच गेले पाहिजे, असे नाही. आपल्या जवळ जे जे आहे, त्यातून राष्ट्र सेवा करायला हवी”, अशी भावना भागवत यांनी व्यक्त केली.