बीबीसी या जगप्रसिद्ध वृत्तसेवेच्या चीनमधील एडिटर कॅरी ग्रेसी यांनी त्यांच्या संपादक पदाचा राजीनामा दिला आहे. बीबीसीत पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत महिला सहकाऱ्यांना कमी पगार दिला जातो. पगाराच्या या भेदभावाला कंटाळून मी राजीनामा देत आहे असे कॅरी ग्रेसी यांनी म्हटले आहे. वेतनातील असमानतेबाबत बीबीसीने ‘गुप्त कायदेशीर वेतन संस्कृती’ पाळली असल्याचा आरोपही त्यांनी केला. दीड लाख पाऊंडपेक्षा जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी दोन तृतीयांश कर्मचारी पुरुष असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र आम्ही महिला आणि पुरुष सहकाऱ्यांच्या पगाराबाबत कोणताही भेदभाव करत नाही असे बीबीसीने म्हटले आहे.

संस्थेसोबत कॅरी ग्रेसी असतील

ग्रेसी यांनी संपादकपद सोडले असले तरीही बीबीसी या संस्थेला सोडचिठ्ठी दिलेली नाही. त्यामुळे मी बीबीसी संस्थेसोबत असेन असेही ग्रेसी यांनी म्हटले आहे. मात्र बीबीसी या वृत्तसंस्थेत पगाराबाबत असमानता दाखवली जाते आहे असा थेट आरोप त्यांनी केला. यासंबंधीचे एक खुले पत्रच त्यांनी जाहीर केले आहे ज्याद्वारे ही माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात त्यांनी चीनी सेवेचे संपादकपद सोडले आहे.

मी बीबीसी या संस्थेत मागील ३० वर्षांपासून काम करते आहे. या संस्थेत पगाराबाबत असमानता असणे हे अस्वस्थ करणारे आहे. पुरुष सहकाऱ्यांच्या बरोबरीनेच महिला सहकारी काम करतात. महिला आणि पुरुष सहकाऱ्यांच्या पगारात भेदाभेद करणे गैर आहे असेही मत त्यांनी मांडले आहे. मी बीबीसीच्या न्यूजरुममध्ये परतेन किमान तेव्हा तरी महिला आणि पुरुष सहकाऱ्यांना समान वेतन मिळण्यास सुरुवात झाली असेल अशी अपेक्षा मी करते असेही ग्रेसी यांनी म्हटले आहे.

बीबीसीच्या दोन आंतरराष्ट्रीय पुरुष संपादकांना महिला संपादकांच्या तुलनेत ५० टक्के पगार जास्त आहे. ही बाब निश्चितपणे चूक आहे. मला पगारवाढ हवी आहे म्हणून मी ही मागणी करत नाही. मात्र मला पगारातील असमतोल नको आहे. ग्रेसी यांनी दिलेला हा राजीनामा बीबीसीसाठी डोकेदुखी ठरतो आहे असे मत बीबीसी मीडिया एडिटर अमोल राजन यांनी व्यक्त केले आहे. ट्विटवरही ग्रेसी यांच्या भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले आहे.