देश सध्या करोनाच्या दुसऱ्या विनाशकारी लाटेचा सामना करत आहे. या दरम्यान अनेक हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना ग्रेटर नोएडा भागातल्या जलालपूर गावात घडली आहे.

या गावातल्या अतारसिंग यांचा मुलगा पंकज याचं निधन झालं. त्यानंतर आपल्या काही नातेवाईकांसोबत त्याचा अंत्यविधी करण्यासाठी गेले. ते स्मशानभूमीतून परत आल्यावर त्यांच्या दुसऱ्या मुलाचंही निधन झाल्याचं वृत्त त्यांना समजलं.

आणखी वाचा- देशात मृत्यूची त्सुनामी; २४ तासांत करोनाबळींचा नवा उच्चांक

पहिल्या मुलाच्या निधनाच्या दुःखातून सावरतो ना सावरतो तोच दुसऱ्या मुलाचंही निधन झाल्यानं अतार सिंग यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. २४ तासाच्या कालावधीतच या दाम्पत्याने आपल्या दोन्ही तरुण मुलांना गमावलं. ह्या दोघांनाही करोनाची लागण झाली होती का याबद्दल अद्याप काही माहिती मिळालेली नाही.
इथल्या गावकऱ्यांनी माहिती दिली की, गावात आत्तापर्यंत १८ जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यापैकी ६ महिला आहेत. ते सांगतात की ऋषी सिंग यांचा मृत्यू सर्वात आधी झाला तर त्यानंतर लगेचच त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला.

आणखी वाचा- …म्हणून करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तरुणांना फटका बसतोय; ICMR ने सांगितलं कारण

या गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या सर्वांना आधी ताप आला आणि नंतर त्यांची ऑक्सिजन पातळी कमी-जास्त होत होती. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेले मृत्यू ग्रेटर नोएडा भागात पसरलेल्या भीतीमुळे झाल्याचं गावकऱ्यांकडून समजत आहे.