पीटीआय, भुवनेश्वर : ओडिशातील रेल्वे अपघाताची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हाती घेतली आहे. पुढील आदेशापर्यंत बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर कोणतीही रेल्वेगाडी थांबणार नाही. ‘सीबीआय’ने हे स्थानक आपल्या ताब्यात घेऊन येथील ‘लॉग बुक’ आणि उपकरणे तपासासाठी जप्त केली आहेत. तेथे २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २८८ लोकांचा मृत्यू झाला होता, तर एक हजार २०८ जण जखमी झाले होते.

दक्षिण-पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आदित्यकुमार चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले, की ‘सीबीआय’ने ‘लॉग बुक’, ‘रिले पॅनेल’आणि इतर उपकरणे जप्त केल्यानंतर स्टेशन ‘सील’ केले. चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले, की ‘रिले इंटरलॉकिंग पॅनेल’ ‘सील’ करण्यात आले आहे, त्यामुळे सिग्नल यंत्रणेत कर्मचाऱ्यांचा प्रवेश प्रतिबंधित आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत बहनगा बाजार स्थानकावर कोणतीही प्रवासी रेल्वेगाडी किंवा मालगाडी थांबणार नाही.

सिग्नल यंत्रणेला आता दुहेरी कवच

नवी दिल्ली :  रेल्वेगाडय़ांच्या नियंत्रण यंत्रणा असलेल्या सर्व ‘रिले रूम्स’, रेल्वे फाटकांवरील सिग्निलग व दळणवळणाची उपकरणे असलेले ‘रिले हट्स’ आणि ट्रॅक सर्किट सिग्नल यांच्यासाठी दुहेरी कुलुपाची (डबल लॉकिंग) व्यवस्था लागू करण्याचा आदेश रेल्वे बोर्डाने शनिवारी दिला.ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जूनला गाडय़ांचा तिहेरी अपघात झाल्यानंतर जारी करण्यात आलेल्या अनेक निर्देशांपैकी रेल्वे विभागांना (झोन) पाठवण्यात आलेला हा सर्वात अलीकडचा अधिकृत संदेश आहे.