भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाची वृत्ते प्रसिद्ध न करणाऱ्या चिनी माध्यमांनी प्रथमच भारताच्या प्रगतीवरुन मायदेशाला धोक्याचा इशारा दिला आहे. ‘भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा वेग पाहता चीन आत्मसंतुष्ट राहू शकत नाही,’ असे ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे. ‘भारत चीनच्या मॉडेलची नक्कल करत असेल तर जगाचे लक्ष भारताकडे जाईल. चीनला हे परवडण्यासारखे नाही,’ असा सूचक इशारा देणारा एक लेख ग्लोबल टाईम्सने प्रसिद्ध केला आहे.
चायनिज कम्युनिस्ट पार्टीच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने भारतीय अर्थव्यवस्था वाढीच्या वेगाबद्दल चीनला सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ‘भारतातील परकीय गुंतवणुकीत मोठी वाढ होते आहे आणि चीनने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,’ असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. चीनमधील लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येतील श्रमशक्ती यांच्याकडेही ग्लोबल टाईम्सने लक्ष वेधले आहे. ‘चीनमधील श्रमशक्ती वेगाने कमी होते आहे. भारताची स्थिती चीनच्या अगदी उलट आहे. भारताच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येचे वयोमान २५ वर्षांपेक्षा कमी आहे. तरुण लोकसंख्या ही भारताची जमेची बाजू आहे,’ असे ग्लोबल टाईम्सने नमूद केले आहे.
भारतातील सौरउर्जा क्षेत्रदेखील वेगाने विस्तारत आहे, असे चीनमधील सरकार नियंत्रित ग्लोबल टाईम्स वृत्तपत्राने म्हटले आहे. बीजिंग बँकेने अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर ग्लोबल टाईम्सने भारताच्या विकासाची गती याबद्दल एक लेख प्रसिद्ध केला. ‘भारताने चीनचे मॉडेल कॉपी केल्यास त्याचा चीनवर काय परिणाम होईल आणि त्याबद्दल चीनला काय करता येऊ शकेल,’ या विषयावर ग्लोबल टाईम्सने विशेष लेख प्रसिद्ध केला आहे.
‘भारत जर जागतिक गुंतवणूकदारांसमोर चीनसोबत स्पर्धा करत राहिला, तर ते चीनसाठी मोठे आव्हान ठरेल. कारण भारतीय बाजारपेठेची क्षमता आणि आकार लक्षात त्यांना चीनचे मॉडेल स्वीकारता येणे अतिशय सोपे आहे. भारताची लोकसंख्या प्रचंड असल्याने श्रमशक्ती अतिशय कमी किमतीत उपलब्ध होते,’ असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.