Bengaluru Crime News: बंगळुरूत एका तरुणाचे अपहरण आणि त्याचे कपडे काढून त्याला मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडित तरुणाने एका अल्पवयीन मुलीला धमकी देणारा मेसेज पाठवला होता. त्यामध्ये त्याने मुलीला, तिच्या प्रेमप्रकरणांबाबत तिच्या कुटुंबियांना माहिती देईन, असे म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणी आता पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह आठ जणांना अटक केली आहे. मुलीला महिला पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले आहे.

ही घटना ३० जून रोजी बेंगळुरूच्या उत्तरेस असलेल्या सोलादेवनहल्ली येथील हेसराघट्टा येथे घडली होती. प्राथमिक पोलीस तपासात असे दिसून आले की, पीडित आणि अल्पवयीन मुलगी प्रेमात होते आणि काही महिन्यांपूर्वी ते वेगळे झाले होते. तसेच या मुलीचे दुसऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळू लागले होते.

दरम्यान, पीडित तरुणाला त्याच्या माजी प्रेयसीच्या नवीन प्रियकराबद्दल कळले तेव्हा त्याने मुलीला मेसेज केला. यामध्ये तो तिला म्हणाला की, “तुला प्रेमसंबंध ठेवण्याची आणि ते तोडण्याची सवय आहे. आता तुझ्या घरच्यांना याबाबत सांगणार आहे.”

यानंतर या मुलीने तिच्या नवीन प्रियकरालाही ही गोष्ट सांगितली. तेव्हा मुलीच्या नवीन प्रियकराने अल्पवयीन मुलीसह पीडित तरुणाचे अपहरण केले. त्याला एका निर्जन ठिकाणी नेऊन त्याचे कपडे काढले आणि काठ्यांनी मारहाण केली. यावेळी मुलीच्या नव्या प्रियकराबरोबर इतर सात ते आठ जणांनीही पीडित तरुणाला मारहाण केली.

अभिनेता दर्शन प्रकरण

गेल्या वर्षी कन्नड अभिनेता दर्शनची प्रेयसी पवित्रा गौडा हिच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या तरुणाची, अभिनेत्याच्या सहकाऱ्यांनी हत्या केल्याचा आरोप आहे. हे ताजे प्रकरणही याच प्रकारचे आहे. गेल्या वर्षी ८ जून रोजी रेणुकास्वामी याच्या हत्येप्रकरणी अभिनेता दर्शन आणि त्यांची प्रेयसी पवित्रा गौडा यांच्यासह १६ जणांना अटक करण्यात आली होती. ही घटना बेंगळुरूतील पट्टणगेरे येथील जप्त केलेल्या वाहनांच्या पार्किंग यार्डमध्ये घडली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फार्मसी स्टोअरमध्ये काम करणाऱ्या रेणुकास्वामी या दर्शनच्या चाहत्याने इन्स्टाग्रामवर पवित्राबद्दल अपमानास्पद पोस्ट केली होती. यानंतर आरोपींनी रेणुकास्वामीचे अपहरण केले. अपहरणानंतर आरोपींनी त्याला मारहाण व छळ केला. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह चित्रदुर्गापासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या बेंगळुरूच्या कामाक्षीपाल्यातील एका नाल्यात टाकला होता.