बंगळुरू मेट्रोमधून दररोल लाखो प्रवासी प्रवास करतात. बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन सातत्याने म्हणत आहे की ते बंगळुरूतील नागरिकांना उत्तम सोयीसुविधा देण्यास कटीबद्ध आहेत. मात्र प्रत्यक्षात वेगळीच स्थिती पाहायला मिळत आहे. मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी एका तरुणाला त्याचे कपडे पाहून मेट्रोत प्रवेश करू दिला नाही. या घटनेमुळे बंगळुरू मेट्रो प्रशासनावर टीका होत आहे. मळलेले कपडे आणि शर्टाची काही बटणं तुटलेली असल्यामुळे बंगळुरू मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी एका तरुणाला मेट्रोत प्रवेश नाकारला आहे. यावर मेट्रो कर्मचाऱ्यांना जाब विचारल्यावर ते म्हणाले, स्वच्छ आणि व्यवस्थित असलेले कपडे घालून यावं. हे कर्मचाऱी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या तरुणाला स्टेशनच्या आवारातून हाकललं.

बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एका तरुणाला त्याच्या मळकट कपड्यांमुळे आणि शर्टाची बटणं उघडी असल्यामुळे मेट्रोत चढण्यास मज्जाव केल्याच्या प्रकरणाची समाजमाध्यमांवर बरीच चर्चा चालू आहे. डोड्डाकलासंद्रा मेट्रो स्टेशनवरील कर्मचारी त्या तरुणाला म्हणाले तुमच्या शर्टाची बटणं लावा आणि स्वच्छ कपडे परिधान करून मेट्रो स्टेशनवर या. तेव्हाच तुम्हाला मेट्रोतून प्रवास करता येईल. अन्यथा तुम्ही मेट्रोतून प्रवास करू शकत नाही.

डोड्डाकलासंद्रा मेट्रो स्टेशनवरील बीएमआरसीएलचे कर्मचारी या तरुणाशी असंवेदनशीलपणे वागत असताना एका सहप्रवाशाने या घटनेचं त्याच्या फोनमध्ये चित्रण केलं. तसेच इतर काही सहप्रवाशांनी मेट्रो कर्मचाऱ्यांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. हा तरुण मजुरीचं काम करतो त्यामुळे त्याचे कपडे मळलेले दिसताहेत असं काही सहप्रवासी मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना म्हणाले, परंतु मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्याला शर्टाची तुटलेली बटणं लावून येण्यास आणि स्वच्छ कपडे परिधान करण्यास सांगितलं. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा >> “आम्ही तुमची माफी स्वीकारणार नाही, कारवाईला सामोरे जा”; बाबा रामदेव यांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

एका नागरिकाने या घटनेचा व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. तसेच बंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सुर्या यांनादेखील यावर टॅग करून कारवाई करण्याची विनंती केली आहे.