उत्तर प्रदेशातील काँग्रेस पक्षाची अवस्था आणि पक्षाच्या नेत्यांवरून केंद्रीय पोलादमंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे काँग्रेस पक्षाची चांगलीच पंचाईत झाली. वर्मा यांना काबूत आणण्यासाठी उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मधुसूदन मिस्त्री कामाला लागले आहेत. बेनीप्रसाद वर्मा गंभीर आरोप करून मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या समाजवादी पक्षाला नेहमीच लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतात. पण या वेळी त्यांच्या आरोपामुळे समाजवादी पक्षाऐवजी त्यांचा काँग्रेस पक्षच लक्ष्य झाला आहे. वर्मा यांनी पक्षसंघटनेशी संबंधित मुद्दे पक्षाच्या व्यासपीठावरच उपस्थित करावे, असा समजवजा सल्ला त्यांना देण्यात येत आहे. बेनीप्रसाद वर्मा यांचा काँग्रेस कार्यकारिणीच्या कायम सदस्यांमध्ये नुकताच समावेश करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात गेल्या वीस वर्षांपासून काँग्रेसच काँग्रेसला पराभूत करीत आहे. काँग्रेसचे काही नेते समाजवादी पक्षाच्या ‘ब’ संघासारखे काम करीत असतात. विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या एका नेत्याने समाजवादी पक्षाकडून पाच कोटी रुपये घेतले होते, असा आरोप वर्मा यांनी केला होता. आपण ही सर्व माहिती काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिली आहे आणि संबंधितांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे वर्मा यांनी म्हटले होते. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी प्रचारात मेहनत करून काँग्रेससाठी अनुकूल वातावरणनिर्मिती केली होती. पण काँग्रेसच्याच काही नेत्यांनी त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले, असा दावा वर्मा यांनी केला. निवडणूक प्रचारात मुस्लिमांना आरक्षण आणि बाटला हाऊस चकमकीचे मुद्दे उपस्थित झाल्याने काँग्रेसची फजिती झाली, असेही ते म्हणाले. निवडणुकीत पैसे घेऊन उमेदवारांना काँग्रेसचे तिकीट देण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेशात काँग्रेसला कमकुवत करणारे नेते कोण आहेत, हे सर्वानाच ठाऊक असून आपण त्यांची नावे घेणार नाही, असेही वर्मा म्हणाले.
या आरोपामुळे समाजवादी पक्षाला वर्मा यांची खिल्ली उडविण्याची संधीच मिळाली. वर्मा मानसिकदृष्टय़ा आजारी असून त्यांच्यावर वृद्धत्वाचा परिणाम होत आहे. वर्मा यांचा इलाज करण्यासाठी काँग्रेसने त्यांना उत्तर प्रदेश सरकारला सोपवावे. राज्यात आग्रा आणि अन्य ठिकाणी चांगली इस्पितळे असून ते ठणठणीत बरे होतील, असा टोला समाजवादी पक्षाचे प्रवक्ते नरेश अग्रवाल यांनी लगावला. काँग्रेसचे प्रवक्ते संदीप दीक्षित यांनी वर्मा यांनी केलेल्या आरोपांवर अधिक भाष्य करण्याचे टाळले. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी त्यांच्याशी चर्चा करतील, असे ते म्हणाले.