नवी दिल्ली : दिग्दर्शक शौनक सेन यांच्या ‘ऑल दॅट ब्रिद्स’ या माहितीपटाने ‘सनडान्स’ चित्रपट महोत्सवामध्ये ‘ग्रॅन्ड ज्युरी’ पुरस्कार पटकावला होता. आता या कलाकृतीने ७५ व्या कान चित्रपट महोत्सवात शनिवारी सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या पुरस्कारावर नाव कोरून सर्वाचे लक्ष वेधले आहे. या पुरस्काराच्या निवड मंडळावरील सदस्यांनी म्हटले आहे की, सध्याच्या विनाशकारी जगात प्रत्येक जीव आणि प्रत्येक लहान कृती महत्त्वाची आहे, याचे स्मरण करून देणारा हा माहितीपट आहे. 

‘ऑल दॅट ब्रिद्स’ या ९० मिनिटांच्या माहितीपटात दिल्लीतील वायुप्रदूषणाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. महम्मद सौद आणि नदीम शेहजाद या भावंडांभोवती कथा फिरते. ते दोघे जण प्रदूषित हवामानात पक्ष्यांना, विशेषत: घारींना वाचवण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपले जीवन समर्पित करताना दिसतात.