आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी बुधवारी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहेत. दिलशान मान आणि सीरत कौर मान या अमेरिकेत राहणाऱ्या भगवंत मान यांच्या दोन मुलांचाही या कार्यक्रमात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ‘आप’च्या या शपथविधी सोहळ्यात पक्षाचे नेते, आमदार आणि मान यांच्या निकटवर्तीयांनाच बोलावण्यात आले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत आपने ९२ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, २१ वर्षीय सीरत आणि १७ वर्षीय दिलशान आपल्या वडिलांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात पोहोचले आहेत. मान यांची पूर्वाश्रमीची पत्नी इंद्रप्रीत कौर यांनी याला दुजोरा दिला आहे. पंजाब निवडणूक जिंकल्यानंतर कौर म्हणाल्या होत्या की, “आमची दोन्ही मुलं भारतात पोहोचली आहेत आणि ते खटकर कलान येथे भगवंत यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. ते खूप उत्साहित आहेत. कौर म्हणाल्या की, भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री बनण्याबद्दलची त्यांची प्रतिक्रिया खूप सकारात्मक होती. मी कायम भगवंत मान यांच्या भल्यासाठी प्रार्थना करायचे आणि या पुढेही करत राहील, असेही इंद्रप्रीत कौर म्हणाल्या.
“मी त्यांच्या यशासाठी नेहमीच खूप मेहनत केली आहे, पण त्याच्या पाठीमागून माझ्याकडून कधीही चुकीचे बोलले गेलेले नाही. वर्षानुवर्षे त्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करायचे आणि या पुढेही करत राहील. आमच्यामध्ये अंतर आहेत, पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करत नव्हतो. मी इथे अमेरिकेत माझ्या कामात आणि माझ्या मुलांचे शिक्षणात व्यस्त होते,” असे इंद्रप्रीत कौर म्हणाल्या.
मान आणि कौर २०१५ मध्ये वेगळे झाले होते. त्यानंतर कौर मुलांसह अमेरिकेत स्थायिक झाल्या. विशेष म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कौर यांनी मान यांच्या प्रचारात चांगलाच घाम गाळला होता. संगरूरच्या गावोगावी त्यांनी जोरदार प्रचार केला होता.
मान यांचा विजय आणि मुख्यमंत्री पदाची घोषणा झाल्यापासून त्यांची आई हरपाल कौर आणि बहीण हरप्रीत कौर यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, संपूर्ण पंजाब हे त्यांचे कुटुंब असूनही, रिकामे घर पाहून वाईट वाटते, हे मान यांनी स्वत: अनेकदा मान्य केले आहे. त्यांनी त्यांच्या मुलांवर असलेले प्रेम अनेकवेळा सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे व्यक्त केले आहे.