scorecardresearch

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचे राजकारण आता दिल्लीतही !

महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी धार्मिक स्थळांवरील (मशीद) भोंग्यांविरोधात रान उठवल्यानंतर, ध्वनिक्षेपकांविरोधातील कारवाईचे राजकीय लोण आता दिल्लीतही पोहोचले आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी धार्मिक स्थळांवरील (मशीद) भोंग्यांविरोधात रान उठवल्यानंतर, ध्वनिक्षेपकांविरोधातील कारवाईचे राजकीय लोण आता दिल्लीतही पोहोचले आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारनेही अनधिकृत भोंग्यांविरोधात मोहीम सुरू केली असून दिल्लीतही धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपक काढून टाकण्याची व त्यावर बंदी घालण्याची मागणी पश्चिम दिल्लीतील भाजपचे खासदार परवेश वर्मा यांनी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना पत्र पाठवून केली आहे.

या मागणीसाठी खासदार वर्मा यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनाही स्वतंत्र पत्र पाठवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर (ध्वनिक्षेपक) बंदी घातली पाहिजे वा त्यांच्या आवाजाची पातळी पात्र मर्यादेत ठेवली पाहिजे. भोंग्यांचा आवाज धार्मिक स्थळांच्या आवारातच ऐकू गेला पाहिजे. त्यांचा आसपासच्या लोकांना, रुग्णांना वा विद्यार्थ्यांना होऊ नये, असे पत्रात नमूद केले आहे.

दुरुपयोग कशासाठी?

‘’सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उत्तर प्रदेशातील योगी सरकारने पालन केले असून दिल्लीमध्येही या आदेशाचे पालन झाले पाहिजे. दिल्लीतील शांतता टिकून राहण्यासाठी पोलिसांनी आवश्यक कारवाई करावी,’’ अशी विनंती वर्मा यांनी पत्रात केली आहे. ‘’मशिदींवर लावलेल्या ध्वनिक्षेपकांचा दुरुपयोग केला जातो. त्याचा सामाजिक सलोख्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मशिदींवरील भोंगे काढून टाकले पाहिजेत,’’ असे वर्मा यांचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशातही मोहीम

उत्तर प्रदेशमध्ये २५ एप्रिलपासून मशिदींवरील भोंग्यांविरोधात कारवाई सुरू झाली आहे. सुमारे ४६ हजार अनधिकृत भोंगे काढून टाकले असून ५८ हजार भोंग्यांचा आवाज मर्यादित ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले जाते. दिल्लीशेजारील गाझियाबादमध्ये ४६७ भोंगे काढून टाकले असून ४०० भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण आणले गेले आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत लखनऊ व गोरखपूर विभागांतील १० हजार ९०० भोंग्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhonga politics now delhi bjp demands ban loudspeakers at religious places ysh

ताज्या बातम्या