पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला अर्ध्यावर मैदान सोडावं लागले होते. भुवनेश्वर कुमारची दुखापत गंभीर नसल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. मात्र, भुवनेश्वर कुमारच्या जागी भारतीय संघाने एका गोलंदाजाचा विचार सुरु केला आहे. सोमवारी नवदीप सैनी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे.
भुवनेश्वर कुमार जखमी असल्यामुळे सध्या त्याला आरामाची गरज आहे. त्यामुळे तो नेटमध्ये सराव करतानाही दिसत नाही. भुवनेश्वर कुमार ऐवजी नवदीप सैनी नेटमध्ये भारतीय फलंदाजांना गोलंदाजी करणार आहे.
याबाबत बीसीसीआयने म्हटले की, ‘नवदीप सैनी मॅन्चेस्टरमध्ये दाखल झाला असून तो भारतीय संघाबरोबर नेट्मध्ये सराव करणार आहे. नवदीप सैनी एकमेव नेट गोलंदाज असेल.’
दुखापतीमुळे भुनेश्वर कुमार तीन सामन्याला मुकणार असल्याचे बीसीसीआयने पाकविरोधातील सामन्यानंतर स्पष्ट केले होते.मात्र, त्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतेही अपडेट दिलेले नाहीत. त्यामुळे भुवनेश्वरच्या दुखापतीचे नेमके स्वरुप काय, याबाबत चर्चेला उधान आले आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भुवनेश्वरने दुखापतीपूर्वी २.४ षटके टाकली होती. त्यानंतर त्याचे उर्वरीत दोन चेंडू विजय शंकरने टाकले होते.
शिखर धवनला दुखापतीमुळे विश्वचषकातून माघारी घ्यावी लागली होती. त्यानंतर आता भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीमुळे भारतीय संघासमोरील चिंता वाढली आहे.