Gujarat Crime: देशभरात सायबर फसवणुकीच्या अनेक घटना दररोज घडत असून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक लोक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेकांना आर्थिक फसवणुकीला समोरं जावं लागत आहे. अशाच प्रकारची एक घटना गुजरातच्या गांधीनगरमध्ये घडली आहे. गांधीनगरमधील एका महिला डॉक्टरकडून तीन महिन्यांत तब्बल १९ कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे गांधीनगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं घटना कशी घडली?
गांधीनगर येथील एका महिला डॉक्टरला १५ मार्च रोजी एक फोन आला. त्या फोनच्या माध्यमातून तिला सांगण्यात आलं की तिच्या फोनमध्ये आक्षेपार्ह मजकूर आढळला आहे. त्यामुळे तिचा फोन बंद करण्यात येणार असल्याचं सांगितलं. तसेच तिच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्याची धमकी संबंधित फोनवरून देण्यात आली. मात्र, सायबर चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यानंतर महिला डॉक्टरला वारंवार फोन सुरू झाले. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, सायबर चोरट्यांनी स्वत:ची ओळख पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये एक उपनिरीक्षक, एक सरकारी वकील आणि इतरांचा समावेश होता. शेवटी या प्रकरणात हेराफेरी करणारे कॉल्स आणि धमकी दिल्यामुळे संबंधित डॉक्टर महिलेला ‘डिजिटल अटक’ करण्यात आली आणि यामध्ये महिला डॉक्टरने तीन महिन्यांच्या कालावधीत तिच्या आयुष्यातील बचत आणि मालमत्ता खरेदीसाठी ठेवलेले तब्बल १९ कोटी रुपये ३५ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले.
एवढंच नाही तर या परिस्थितीचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज मिळवून ते पैसे देखील लंपास केले. सतत धमकी देण्यात येणाऱ्या फोनमुळे ही महिला डॉक्टर घराबाहेर पडताना फसवणूक करणाऱ्यांना तिचा ठावठिकाणा सांगत असत. त्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक छळ करण्यात येत होता. मात्र, त्यानंतर एके दिवशी अचानक कॉल बंद झाले. त्यानंतर त्या महिलेने तिच्या नातेवाईकांना फसवणूक झाल्याचं सांगितलं. मात्र, तो पर्यंत खूप उशीर झाला होता.
दरम्यान, या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली असून सुरतमध्ये एका आरोपीला अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील संशयिताची चौकशी केली जात आहे. जेणेकरून हे नेटवर्क उघड होईल आणि घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटेल. तसेच सायबर चोरट्यांनी महिला डॉक्टरकडून १९ कोटी उकळल्यानंतर हे पैसे परत मिळवणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. १६ जुलै रोजी मिळालेल्या तक्रारीच्या आधारे गुजरातमधील सीआयडी क्राईमच्या सायबर सेलने पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.