Bihar Assembly Election Results 2025 Maithili Thakur Alinagar Assembly constituency : बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, जनता दल (संयुक्त) आणि लोक जनशक्ती (रामविलास) या पक्षांनी जोरदार विजय मिळवत विरोधकांचा अशरक्षः सुपडा साफ केला आहे. एनडीएने स्पष्ट बहुमताची संख्या पार केली आहे. भाजपाने जदयुला बरोबर घेत बिहारच्या विधानसभेत जोरदार मुसंडी मारल्याचे या निकालावरून दिसून आले. भाजपाने सर्वाधिक ८९ तर, जदयुने ८५ जागांवर विजय मिळवला आहे.
या निवडणुकीच्या माध्यमातून बिहारच्या जनतेला यंदा अनेक नवे आमदार मिळाले आहेत. या निवडणुकीत असे असंख्य उमेदवार होते जे पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते. त्यापैकी काहींना यश मिळालं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाला पहिली जेन-झी (Gen Z) आमदार मिळाली आहे. या आमदार तरुणीचं नाव मैथिली ठाकूर असं असून ती लोकप्रिय गायिका आहे. ती बिहारमधील अलीनगर मतदारसंघातून निवडणुकीला उभी राहिली होती. तिने या मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे.
अलीनगरमध्ये मैथिलीचा मोठा विजय
मैथिलीने राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार बिनोद मिश्रा यांचा ११,७३० मतांनी पराभव केला आहे. या विजयासह मैथिली बिहारमधील सर्वात तरुण आमदार बनली आहे. मैथिलीने ६३ वर्षीय बिनोद मिश्रा यांना पराभूत करून इतिहास रचला आहे. अलीनगरमधून भाजपाचा हा पहिलाच विजय आहे. मैथिलीला ८४,९९५ मतं मिळाली आहेत. तर मिश्रा यांना ७३,१८५ मतं मिळाली आहेत.
कोण आहे मैथिली ठाकूर?
मैथिली ही मूळची मधुबनी येथील रहिवासी आहे. तिचा जन्म मधुबनी येथेच झाला. त्यानंतर तिचं कुटुंब नजफगडला राहायला गेलं. तिच्या बालपणी ठाकूर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्याचदरम्यान तिने संगीत शिक्षणाकडे कल वळवला. तिचं कुटुंब संगीतप्रेमी आहे. संगीतातले तिचे पहिले गुरू तिचे वडील आहेत. त्यांनी तिला हिंदुस्तानी शास्त्रीय आणि लोकसंगीतावर प्रभुत्व मिळवण्यास मदत केली.
मैथिलीने वयाच्या चौथ्या वर्षापासून संगीत शिकण्यास सुरुवात केली. तिचे वडील रमेश ठाकूर हे संगीत शिक्षक असून ते वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये भजन गातात. मैथिलीची आई भारती गृहिणी आहे. तिचा मोठा भाऊ ऋषभ ठाकूर हा तबला वादक आहे आणि तिचा धाकटा भाऊ अयाची ठाकूर हा देखील गायक आहे. मैथिली ठाकूर २५ वर्षांची आहे. द रायझिंग स्टार या शोमधून तिला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. तिच्या यूट्यूब चॅनेलवरील भजन आणि लोकगीतांद्वारे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ती हिंदी, मैथिली, भोजपुरी आणि बंगालीसह अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गाते.
