Lalu Prasad Yadav Family Divide: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला खूप मोठा धक्का बसला. २०२० साली ७५ जागा जिंकून सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाला यावेळी फक्त २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच पक्षाचे सर्वेसर्वा तेजस्वी यादव यांना स्वतःच्या मतदारसंघात विजय प्राप्त करताना काही वेळ संघर्ष करावा लागला होता. निकालाच्या दुसऱ्या दिवशी याता लालू यादव यांच्या पक्षाला आणि कुटुंबाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे.
तेजस्वी यादव यांची मोठी बहीण आणि वडील लालू यादव यांना स्वतःची किडनी दान करणाऱ्या रोहिणी आचार्य यांनी राजकारणातून बाजूला जात असल्याची घोषणा केली आहे. तसेच कुटुंबियांशीही आपण सर्व संबंध तोडत आहोत, असेही रोहिणी आचार्य यांनी जाहीर केले आहे. हे जाहीर करताना त्यांनी पक्षातील दोन लोकांच्या नावांचा उल्लेख केला आहे.
काही महिन्यांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी स्वतःच्या मोठ्या मुलाची पक्षातून हकालपट्टी केली होती. सार्वजनिक जीवनातील संकेत न पाळल्याबद्दल मुलाला पक्ष आणि कुटुंबातून बेदखल करत असल्याचे लालू प्रसाद यादव यांनी जाहीर केले होते. तेजप्रताप यादव यांना बाहेर काढल्यानंतर त्यांनी स्वतःचा जनशक्ती जनता दल हा पक्ष स्थापन केला होता.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेजप्रताप यादव यांचा जनशक्ती जनता दल पक्षही मैदानात उतरला होता. मात्र तेजप्रताप यादव यांना स्वतःला महुआ विधानसभेतून पराभव सहन करावा लागला. तसेच त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. यानंतर तेजप्रताप यांनी पक्षाच्या फेसबुकवर एक लांबलचक पोस्ट करत आरजेडीवर टीका केली आहे.
तेजस्वी फेलस्वी झाला
जनशक्ती जनता दलाच्या फेसबुक पेजवर केलेल्या कथित पोस्टमध्ये तेजप्रताप म्हणाले, “मी पराभूत होऊनही जिंकलो आहे. कारण माझ्याबरोबर जनतेचे प्रेम, विश्वास, आशीर्वाद आहे. सत्य कटू आहे. आरजेडीमधील जयचंद लोकांनी पक्षाला आतून पोखरले आहे. यामुळेच तेजस्वी फेलस्वी झाला. ज्यांनी खुर्ची आणि राजकारण वाचविण्यासाठी स्वतःच्या घरालाच आग लावली, इतिहास त्यांना कधीही माफ करणार नाही. मी नेहमी सांगतो जनताच मायबाप असते. आज मायबाप जनतेने दिलेला निर्णय मी स्वीकारत आहे.”
पंतप्रधान मोदींचे केले कौतुक
“बिहारच्या जनतेने सुशासन देणारे सरकार निवडले आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. हा विजय आपले कर्मठ पंतप्रधान आणि जगातील सर्वात शक्तीशाली नेते नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या जादूई नेतृत्वामुळे शक्य झाला आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा..”, या शब्दात तेजप्रताप यादव यांनी एनडीएचे कौतुक केले.
रोहिणी आचार्य काय म्हणाल्या?
रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मी माझ्या कुटुंबीयांशीही सर्व संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. मी जो काही निर्णय घेतला आहे त्यासाठी पूर्णपणे मी जबाबदार आहे.”
